नव्या हंगामात संघाचे भाग्य बदलण्यासाठी चेल्सी संघाच्या व्यवस्थापनाने प्रशिक्षकपदी अँटोनिओ कोन्टे यांची नियुक्ती केली आहे. ४६ वर्षीय कोन्टे यांनी यापूर्वी ज्युवेन्टस क्लब आणि इटलीच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. संघाची कामगिरी ढासळल्याने जोस मोर्निन्हो यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या ऐवजी ग्युस हिडिन्क कार्यरत आहेत. या हंगामाच्या अखेरीपर्यंत हिडिन्क प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत. तीन वर्षांकरता कोन्टे प्रशिक्षकपद भूषवणार आहेत.
कोन्टे यांच्या मार्गदर्शनाखालीच ज्युवेन्ट्स संघाने ‘सीरी ए’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना ज्युवेन्ट्स संघाने ‘सीरी ए’ स्पर्धेत ११४ पैकी ८३ सामने जिंकले. मे २००१ ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सलग ४९ सामने अपराजित राहण्याचा विक्रमही ज्युवेन्ट्स संघाने कोन्टे यांच्या कार्यकाळात नावावर केला होता. गिआनल्युसा व्हिआली, क्लॉडिओ रानिइरी, कालरे अ‍ॅन्सलोटी आणि रॉबटरे डी मॅटेय यांच्यानंतर चेल्सीची प्रशिक्षकपद भूषवणारे कोन्टे पाचवे इटलीकर आहेत.
इटलीचे मध्यरक्षक म्हणून खेळलेल्या कोन्टे यांनी ज्युवेन्ट्स क्लबचे ४०० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. ‘सीरी ए’ स्पर्धेची पाच आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे एक जेतेपद पटकावणाऱ्या ज्युवेन्ट्स संघाचा कोन्टे भाग होते.