बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र बुकींसह ठाकूर यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर शीतयुद्धाची जाहीर ठिणगी पडली आहे.
चंदिगढमध्ये अनुराग ठाकूर कथित बुकी करण गिल्होत्रा याच्यासमवेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठाकूर यांना बुकी, सट्टेबाजांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. एन. श्रीनिवासन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. आपल्यावर झालेली टीका श्रीनिवासन यांच्यामुळेच झाली असल्याचे हेरत ठाकूर यांनी श्रीनिवासन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
‘श्रीनिवासन यांनी स्वत:च्या कुटुंबातील सट्टेबाजी प्रकरणात न्यायालयाद्वारे दोषी आढळलेल्या बुकींची माहिती जाहीर करावी. तुम्ही बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी असतानाच मी सचिवपदी कार्यरत होतो. शहानिशा न झालेल्या कथित बुकींची यादी तुम्ही माझ्यासह अन्य कर्मचाऱ्यांना द्यायला हवी होती. जेणेकरून कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही हे आम्ही ठरवू शकतो. मी ज्या व्यक्तीला भेटलो आणि ज्यावरून वादंग झाला ती व्यक्ती राजकारण तसेच क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. बुकी अथवा कोणत्याही गैरप्रकाराशी ही व्यक्ती संलग्न असल्याचे मला ठाऊक नाही,’ असे ठाकूर यांनी जाहीर पत्रात म्हटले आहे.
‘ठाकूर यांना वैयक्तिक पत्राद्वारे उत्तर देईन’
बुकींसह छायाचित्रासंदर्भात अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांद्वारे लिहिलेले पत्र मी वाचले आहे. मात्र त्याला जाहीरपणे उत्तर देण्यापेक्षा मी ठाकूर यांना वैयक्तिक पत्र लिहेन. ठाकूर यांनी हल्लाबोल केल्यामुळे अवाक् झालात का, असे विचारले असता श्रीनिवासन म्हणाले, ‘जर पत्रातील मजकुराविषयी मला काही वाटले तर मी ठाकूर यांना पत्र लिहून स्पष्ट करेन. करण गिलहोत्रा या कथित बुकीसह ठाकूर यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना पत्र लिहिले होते. यामध्ये ठाकूर यांनी  सट्टेबाजांपासून लांब राहावे अशा आशयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. श्रीनिवासन आयसीसीचे कार्याध्यक्ष असल्यामुळेच ही कारवाई झाल्याचे लक्षात येऊन ठाकूर यांनी पत्राद्वारे श्रीनिवासन यांच्यावर हल्लाबोल केला होता.