भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर अनुराग ठाकूर यांचा राज्याभिषेक झाला आहे. आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वात युवा अध्यक्ष म्हणून ठाकूर यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्वतंत्र कार्याध्यक्ष पदावर दावेदारी करण्यासाठी १२ मे रोजी शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. बीसीसीआयचे सचिवपद भूषवणाऱ्या ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व सदस्य संघटनांचा पाठिंबा होता. त्यामुळे ठाकूर यांच्या नामनिर्देशन पत्रावर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.