वेस्ट इंडिजचा संघ काही वर्षांपूर्वी भारतीय दौऱ्यावर आला असताना ब्रायन लारा चांगल्या फॉर्मात नव्हता. त्या वेळी त्याला काही पत्रकार हॉटेलवर भेटायला गेले होते. तेव्हा त्यांच्या व्यवस्थापकाने सांगितले की, लाराला त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर रूममध्ये कोंडून ठेवले आहे. तो सामन्यानंतरच तुम्हाला भेटेल. पत्रकारांचा हिरमोड झाला, पण संघाचा नाही. कारण त्यानंतरच्या सामन्यात लाराने दमदार खेळी साकारली होती. क्रीडा स्पर्धा सुरू असताना पत्नी आणि मैत्रिणींना किती अंतरावर ठेवावे, याबाबत नेहमीच चर्चा ऐरणीवर असते. फुटबॉल क्षेत्रात पत्नी आणि मैत्रिणींना ‘वॅग्ज’ म्हटले जाते. नुकत्याच ब्राझीलमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी बहुतांशी संघांनी खेळाडूंच्या ‘वॅग्ज’बाबत धोरणे आखली होती, तर विश्वविजेत्या जर्मनीच्या खेळाडूंबरोबर त्यांच्या ‘वॅग्ज’ होत्या. भारतात मात्र ‘वॅग्ज’ संस्कृती रुळलेली नाही. पण या वेळी बीसीसीआयने खेळाडूंच्या गर्लफ्रेंडनाही दौऱ्यावर न्यायची परवानगी दिली होती. त्यामुळेच विराट अनुष्का शर्मासोबत प्रेमलीलांच्या खेळपट्टीवर रममाण झाला, तेवढा क्रिकेटच्या खेळपट्टीवर नाही, अशा चर्चाना ऊत आला.
विराट आणि अनुष्का शर्मा ही सध्याची हॉट जोडी. एका शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये या रेशीमगाठी जुळून आल्या. अनुष्का बॉलीवूडमधली तर विराट क्रिकेटबरोबर पाटर्य़ामध्येही आपली छाप पाडणारा. पण जेव्हा जेव्हा खेळाडू चंदेरी दुनियेतील ललनेच्या प्रेमात पडले, तेव्हा तेव्हा त्यांचे लक्ष क्रिकेटपासून परावृत्त झाल्याचे दाखले आहेत. काही वर्षांपूर्वी युवराजचेही दीपिका पदुकोणच्या प्रेमात पडल्यावर असेच झाले होते. कोहली म्हणजे धावांची टांकसाळ वाटायचा. पण न्यूझीलंडनंतर आता इंग्लंडमध्ये त्याच्या धावांना ओहोटी लागली. कारण दोन्हीकडे अनुष्का मॅडम होत्या. पाच कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडने जेवढय़ा अवांतर धावा दिल्या, तेवढय़ा धावा कोहलीला करता आल्या नाहीत. कदाचित ‘तेरे चेहरे से नजर नही हटती..’ हे गाणे कोहली इंग्लंडमध्ये आळवत बसला असावा. त्यामुळेच त्याला मैदान सोडायची लगीनघाई झाल्याचे वाटत होते.
खरे तर संघाच्या व्यवस्थापकांनी विराटला अनुष्काबाबत विचारले होते, पण कोहलीने थेट बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांची परवानगी घेतल्याचे सांगितले. आता कोण काय बोलणार असे विराटला वाटले, पण त्याच्या मैदानावरच्या गचाळ कामगिरीमुळे अनुष्का चर्चेत आली आणि युवराजनंतर कोहलीलाही ‘कोण होतास तू, काय झालास तू..’ गाणे काही जणांनी ऐकवले. पण विराटची भावनिक स्थिती ‘तुझमें रब दिखता है, यारा मै क्या करू..’ अशी केविलवाणी झाली आहे.
एखादी व्यक्ती आपल्यासाठी यशस्वी ठरते, याला श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा, हे ज्याचे त्याने ठरवावे. पण अनुष्काचा सहवास कोहलीला मात्र मैदानावर तरी फळलेला दिसत नाही. त्याने आता काय करायचे, हे सल्ले जवळपास सारेच जण देताना दिसत आहेत. त्याने अनुष्काबरोबर संबंध ठेवावे की नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु धावा करणे हाच तुझा खरा धर्म आहे, हे कुणीतरी त्याला सांगायची गरज आहे.