भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी २४ सप्टेंबरच्या IPL सामन्यादरम्यान एक वक्तव्य केलं होतं. बंगळुरू आणि पंजाबमधील सामन्यात समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचा उल्लेख केला होता. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की (विराटने) इन्होंने” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या मुद्द्यावर बरेच दिवसांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

रवी शास्त्री यांनी नुकतीच टाइम्सनाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्याचवेळी त्यांना गावसकर-अनुष्का वादाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ते म्हणाले, “गावसकरांनी जे वक्तव्य केलं, त्यावर जर अनुष्का शर्मावा व्यक्त व्हावंसं वाटलं असेल तर तिला तिचं मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जर तुम्ही गावसकरांनी केलेलं वक्तव्य चूक की बरोबर असं विचारलंत, तर मी इतकंच सांगेन की मी तशापद्धतीचं वक्तव्य नक्कीच केलं नसतं”, असं रोखठोक मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं.

गावसकरांच्या विधानावर अनुष्काची नाराजी

“इतर खेळाडूंच्या कामगिरीसाठी त्यांच्या जोडीदारांना नावं ठेवली जात नाहीत. तशी वागणूक मला केव्हा मिळणार? मी अपेक्षा करते की पुढच्या वेळी तुम्ही विराटच्या खेळीचं वर्णन करताना माझा संदर्भ येऊ देणार नाही”, अशा स्पष्ट शब्दात अनुष्काने गावसकर यांना सुनावलं होतं.

गावसकरांनी दिलं होतं सडेतोड उत्तर

“मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवलं नाही. लॉकडाउनमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती. त्याबद्दल बोलताना मी तसं म्हणालो. ज्यांना माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल त्यांनी ती क्लिप नीट ऐका आणि मला सांगा की मी काय चुकीचं बोललो? स्वत: व्हिडीओ बघा आणि ठरवा. मी माझ्या भूमिकेबाबत अजिबातच साशंक नाही”, असं गावसकर म्हणाले होते.