युवा फुटबॉलपटू अन्वर अलीला प्रकृतीच्या कारणास्तव फुटबॉल खेळण्यास नकार देण्यात आल्यानंतर त्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाविरुद्ध (एआयएफएफ) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याच क्रीडा संघटनेविरुद्ध एखाद्या खेळाडूने न्यायालयात दाद मागण्याची ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील पहिलीच घटना आहे. या प्रकरणाची गुरुवारी (१ ऑक्टोबर) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पंजाबचा २० वर्षांचा खेळाडू अली याला हृदयविकाराशी संबंधित आजार झाल्याने त्याने या खेळामध्येच कारकीर्द घडवण्यासाठी अन्य पर्याय निवडावा, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (एआयएफएफ) सुचवण्यात आले आहे. पुन्हा फुटबॉल खेळण्याचा विचार त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्याने खेळणे निवडू नये, असे ‘एआयएफएफ’ने म्हटले आहे. ‘एआयएफएफ’च्या वैद्यकीय समितीसह आशिया फुटबॉल महासंघाच्या डॉक्टरांनी अलीचे पुन्हा फुटबॉल खेळणे त्याच्या जिवावर बेतू शकते, असे म्हटले आहे.

अलीचा हा आजार गेल्यावर्षी समोर आल्यानंतर त्याला स्पर्धात्मक फुटबॉल ‘एआयएफएफ’ने खेळू दिलेले नाही. मात्र अलीची अजूनही फुटबॉल खेळण्याची जिद्द कायम आहे. त्यासाठीच त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. ‘‘अलीला खेळण्यासाठी थांबवण्याचा एआयएफएफला अधिकार नाही. अली मुंबई एफसीकडून खेळणार होता. त्यामुळे हा विषय क्लब आणि खेळाडू यांच्यामधील आहे. अलीच्या जिवाला धोका असल्याचे महासंघ सांगतो. मात्र महासंघ हे कशावरून ठरवते,’’असा प्रश्न अन्वर अलीचे वकील अमिताभ तिवारी यांनी केला आहे.

अन्वरने २०१७मध्ये झालेल्या कुमार विश्वचषकात (१७ वर्षांखालील) प्रत्येक लढतीत प्रत्येक मिनिट खेळून भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ‘‘अन्वर अली हा सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला आहे. भारताचे त्याने कुमार विश्वचषकात यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याला फुटबॉल खेळू देणे योग्य नाही. अलीला हा निर्णय सांगताना आम्हाला खेद होत आहे पण आमचा नाइलाज आहे,’’ असे आशिया फुटबॉल महासंघाच्या वैद्यकीय पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फ्रान्सच्या डॉक्टरांचेही फुटबॉल महासंघाकडून अन्वर अलीच्या प्रकृतीबाबत मत मागवण्यात आले होते. त्यांनीदेखील अन्वरला यापुढे फुटबॉल खेळू न देण्याचे सांगितले आहे.

फुटबॉलमध्ये प्रशिक्षक किंवा अन्य विषयात कारकीर्द घडवावी असे ‘एआयएफएफ’ने अलीला सांगितले आहे. ‘‘हृदयाशी संबंधित अलीला जो त्रास आहे ते ऐकून आम्हाला धक्का बसला. प्रशिक्षकपद त्याला स्वीकारायचे असेल तर त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ. फुटबॉलमध्ये खेळ सोडून जी कारकीर्द त्याला घडवायची असेल त्यासाठी आम्ही मदत करू. मात्र त्याला खेळवण्याचा धोका आम्ही पत्करणार नाही,’’ असे ‘एआयएफएफ’चे सरचिटणीस कुशल दास यांनी स्पष्ट केले आहे.