भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो अद्याप टीम इंडियाच्या संघात परतलेला नाही. माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी आपल्या मुलाखतीत नुकतेच सांगितले होते की आम्ही चर्चा करून मगच धोनीबाबतचा निर्णय घेतला होता. धोनीलाच क्रिकेटपासून दूर राहायचं होतं, त्यामुळे आम्ही ऋषभ पंतचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्या एका वक्तव्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

“विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी बाबर आझमची फलंदाजी बघा”

समालोचक आकाश चोप्रा यांच्या आकाशवाणी कार्यक्रमात नेहराने मुलाखत दिली. त्यावेळी नेहराने धोनीच्या ‘कूल’ अंदाजाबद्दल एक किस्सा सांगितला. “लोकांना वाटतं की धोनी मितभाषी आहे. तो खेळाडूंशी फार काही बोलत नसावा. पण तसं अजिबातच नाहीये. त्याची रूम सामना संपल्यानंतर रात्रीच्या वेळी कायम आम्हा खेळाडूंसाठी खुली असते. कोणीही त्याच्या रूम मध्ये जा, खायला मागवा आणि क्रिकेटबद्दल गप्पा मारा… धोनीला काहीही अडचण नसते. धोनी चेन्नई संघासाठी खेळत असो वा भारतीय संघाकडून खेळत असो, तो त्याचं मत लगेच सांगतो आणि धोनीचं ते मत खेळाडूंच्या शंकांचं निरसन करण्यासाठी पुरेसं असतं”, असं नेहराने सांगितलं.

विराटवर केली सडकून टीका

“जर तुम्ही मालिका जिंकला असतात आणि त्यानंतर असं बोलत असाल तर ठीक आहे. यंदाचं वर्ष हे टी २० क्रिकेटचं आहे त्यामुळे आम्ही एकदिवसीय क्रिकेटबाबत फारसा विचार करत नाही, हे विराटचं वक्तव्य अगदी चुकीचं आहे. जर एकदिवसीय सामने महत्त्वाचे नाहीत, तर मग तुम्ही तिथे खेळायला गेलातच कशासाठी? यातून विराटला असं म्हणायचं होतं का की भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही. मला विराटचं म्हणणं अजिबात मान्य नाही”, असं सडेतोड मत नेहराने व्यक्त केलं.

“गांगुली आणि धोनीच्या स्वभावात एक साम्य”

या मुलाखतीत बोलताना नेहराने सौरव गांगुली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या मैदानावरील स्वभावातील एक साम्य सांगितलं. “धोनी आणि गांगुली हे दोघे अतिशय भिन्न स्वभावाचे कर्णधार होते. पण दोघांमध्ये एक साम्य होते. ते साम्य म्हणजे दोन्ही कर्णधारांकडे संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचे कसब होते. गांगुलीने जेव्हा कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा संघ नवीन होता. याउलट धोनीने नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा संघात अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू होते. त्यांना नीटपणे हाताळणे ही धोनीपुढील कसोटी होती. दोघांनीही संघ नीटपणे हाताळले आणि त्यामुळे भारताला चांगले दिवस आलेले दिसत आहेत”, असं नेहराने नमूद केलं.