अॅपलचे सीईओ टीम कुक सध्या भारत भेटीवर असून, गुरुवारी त्यांनी कानपूर येथे आयपीएल सामन्याला हजेरी लावली. भयंकर उकाडा असतानादेखील त्यांनी गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरमान्यच्या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला. यावेळी आयपीएलचे संचालक राजीव शुक्ला आणि अभिनेता संजय दत्तदेखील उपस्थित होते. हे सर्व आश्चर्यचकीत करणारे असल्याचे सांगत, क्रिकेट पाहून आपण अतिशय प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले. भारत हा आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण देश असल्याचे मत व्यक्त करीत, भारत ही एक फार मोठी बाजारपेठ असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या उज्ज्वल भविष्याबाबात त्यांनी आशा व्यक्त केली. हवामानातील उष्णतेबाबत बोलताना टीम कुक म्हणाले, या उकाड्यात क्रिकेटचा सामना बघणे फार कठीण असले तरी यापूर्वी मी कधीही असे काही पाहिले नाही. यावरून भारतातील खेळाचे आणि किक्रेटचे महत्व समजते. आयपीएलचे संचालक राजीव शुक्ला यांनी दिलेल्या आमंत्रणावरून टीम कुक मॅच पाहायला आले होते. कुक यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्वपूर्ण असून, आम्ही अॅपलच्या तंत्रज्ञानाचा स्थानिक क्रिकेटमध्ये वापर करणार असल्याचे मनोगत यावेळी बोलताना राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले. कानपूरमध्ये पहिल्यांदाच आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे हे सामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्यात येत असल्याने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडिअमवर सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.