रामन यांच्या हकालपट्टीप्रकरणी निवड समिती, क्रिकेट सल्लागार समितीची भूमिका संशयास्पद

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून डब्ल्यू. व्ही. रामन यांची अनौपचारिकपणे हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणी मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) आणि नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रामन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे रामन हे भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक समजले जात. पण मदनलाल आणि सुलक्षणा नाईक यांच्या सल्लागार समितीने त्यांना डच्चू देत भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

क्रिकेट सल्लागार समिती अनधिकृत?

मदनलाल यांनी २० मार्च २०२१ रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण केली. लोढा समितीच्या शिफारशीनुसार ७० वर्षांवरील व्यक्तींना कोणत्याही पदावर राहता येणार नाही. असे असतानाही मदनलाल हे क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकांना कसे उपस्थित राहू शकले? असा सवाल ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने केला आहे.

नाईक यांची भूमिका संशयास्पद

भारताची माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांनी आतापर्यंत सल्लागार समितीच्या तीन बैठकांना हजेरी लावली आहे. पण रामन यांची हकालपट्टी करायचीच, हे नाईक यांनी मनाशी पक्के केले होते. महिला प्रशिक्षकपदासाठी आठ उमेदवारांच्या मुलाखती घेताना, ते स्पष्ट जाणवत होते. भारतीय महिला संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवण्याचे श्रेय तुम्ही का घेता, हा संघ पोवार यांनी तयार केला होता, असा आश्चर्यकारक सवालही नाईक यांनी रामन यांना विचारला होता.

महिला संघातील अनेक खेळाडूंनी रामन यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. सराव सत्र सुरू असताना रामन हे मध्येच गायब होत तसेच चांगली कामगिरी करूनही खेळाडूंचे कौतुक करण्यात ते आखडता हात घेत. यष्टीरक्षक नुझत परवीन हिने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असतानाही रामन यांनी तिला पदार्पणाची टोपी दिली होती. महिला संघाच्या प्रशिक्षकाला एखाद्या खेळाडूविषयी इतकीही माहिती  नाही का? असा सवाल विचारला जात आहे.

रामन यांच्याविरोधातील काही मुद्दे

तारांकित संस्कृतीबाबत रामन यांचे गांगुली, द्रविडला पत्र

भारतीय महिला क्रिकेट संघातील तारांकित संस्कृती बदलण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रामन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख राहुल द्रविड यांना पाठवले आहे. ‘‘संघातील एक खेळाडू कायम केंद्रस्थानी राहू शकत नाही. तारांकित संस्कृती संघासाठी घातक ठरत आहे. काही खेळाडू संघापेक्षा वरचढ ठरत आहेत. गांगुलीने याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे,’’ असे रामन यांनी या पत्रात म्हटल्याचे समजते.

आफ्रिका दौऱ्यासाठी वादग्रस्त संघनिवड

नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील तसेच आरती वैद्य, रेणू मार्गरेट, मिथू मुखर्जी आणि व्ही. कल्पना या सदस्यांचा समावेश असलेल्या  निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी युवा फलंदाज शफाली वर्मा आणि वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांना वगळले होते. पण या निवडीला रामन यांनी  नकार दिला होता. पांडे ही तंदुरुस्त नसून सरावात मेहनत घेत नाही, असे निवड समितीचे म्हणणे होते. पण हे मुद्दे निवड समिती पटवून देऊ शकली नाही.