प्रशांत केणी

महाराष्ट्राच्या कबड्डीने दृष्टिकोन बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या कामगिरीबाबत कबड्डीक्षेत्रात उमटले आहेत. जयपूरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुषांचा संघ उपांत्यपूर्व फेरीत, तर महिलांचा संघ साखळीतच गारद झाला.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी नेमलेल्या प्रशिक्षकाला आणि निवड समितीला किमान दोन वर्षांचा कार्यकाळ असावा, राज्य अजिंक्यपद स्पर्धा मॅटवर सहा महिने आधी घेऊन विशेष शिबिरांची संख्या वाढवावी, राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची सांख्यिकी उपलब्ध करू शकणारी गुणपत्रिका वापरावी, प्रो कबड्डी लीगमधील खेळाडूंना स्थान द्यावे, अशा सूचना कबड्डीतील जाणकारांनी दिल्या आहेत.

संभाव्य भारतीय संघात महाराष्ट्राचे तीन खेळाडू

जयपूरला झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या संभाव्य भारतीय संघात महाराष्ट्राच्या दोन पुरुष आणि एका महिला खेळाडूने स्थान मिळवले आहे. पुरुषांच्या संघात पंकज मोहिते आणि शुभम शिंदेचा समावेश आहे, तर महिलांमध्ये मेघा कदमने स्थान मिळवले आहे. महिला संघात रेल्वेकडून खेळणाऱ्या मुंबईच्या सोनाली शिंगटे आणि गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या नेहा घाडगेचाही समावेश आहे. पुरुषांमध्ये रेल्वेच्या श्रीकांत जाधवला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिंकण्यासाठीच संघ निवडावा!

फक्त राज्य अजिंक्यपद स्पर्धेऐवजी वर्षभराच्या स्पर्धातील कामगिरीआधारे महाराष्ट्र जिंकण्यासाठीचा संघ निवडावा. सध्याच्या महाराष्ट्राच्या संघात गिरीश ईर्नाक, विकास काळे हवे होते. प्रशिक्षक आणि निवड समितीमध्ये अनुभवी आणि निष्णात व्यक्ती असावेत. कुमार, किशोर या गटांच्या शिबिरांची संख्या वाढवायला हवी. हिमाचल प्रदेशप्रमाणे राज्यात क्रीडा निवासी आश्रम निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आता शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात कबड्डीची गुणवत्ता निर्माण होते आहे. तिथेच लक्ष केंद्रित करायला हवे.

– प्रताप शेट्टी, भारत पेट्रोलियम संघाचे प्रशिक्षक

खेळाडूंची आकडेवारीसुद्धा पाहावी!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंच्या सांख्यिकीला स्थान दिले जावे आणि निवड प्रक्रियेत त्याची अंमलबजावणी व्हावी. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील नवोदित खेळाडू उत्तम खेळले, पण अनुभवी खेळाडूंची साथ मिळणे महत्त्वाचे होते. गिरीश ईर्नाकसारख्या खेळाडूचे प्रतिस्पर्धी संघांवर दडपण असते. शिबिरांचे दिवस वाढवावेत आणि निवड समितीमध्येही अनुभवी व्यक्ती असावेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी बसने प्रवासामुळे खेळाडूंचे अतोनात हाल झाले. याकडेसुद्धा गांभीर्याने पाहावे.

– विश्वास मोरे, भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे पंच समन्वयक

खेळाडूंची आकडेवारीसुद्धा पाहावी!

प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असावा. तसेच प्रत्येक वर्षी त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करावे. निवड समितीत सचिवालाही स्थान द्यावे. प्रशिक्षक कुणालाही करू नये, मार्गदर्शनाची क्षमता असलेल्या खेळाडूलाच करावे. राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे शिबीर हे २०-२५ दिवसांचे असावे. काही दर्जेदार राज्यस्तरीय स्पर्धानाही निवड चाचणीचा दर्जा द्यावा.

– शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते माजी कबड्डीपटू