युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारी पहिली महिला भारतीय टेबलटेनिसपटू

युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

ब्यूनोस आयर्स : भारतीय टेबल टेनिसपटू अर्चना गिरीश कामतने बुधवारी सुरेख खेळाचे प्रदर्शन घडवताना युवा (१८ वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत टेबलटेनिसमध्ये मुलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या भारतीय महिलेने उपांत्य फेरी गाठण्याची किमया केली आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत १८ वर्षीय अर्चनाने अझरबैजानच्या निग्न जिंगचा ४-३ (१३-११, ८-११, ६-११, ११-३, ६-११, १२-१०, ११-७) असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिच्यासमोर चीनच्या दुसऱ्या मानांकित यिंगशा सूनचे आव्हान उभे ठाकले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत अर्चनाने मलेशियाच्या जॅव्हेन चाँगचा ४-२ असा पराभव केला होता.

पहिला गेम अर्चनाने संघर्ष करून जिंकल्यानंतर दुसरा व तिसरा गेम जिंकून जिंगने जोरदार पुनरागमन केले. चौथा व पाचवा गेम अनुक्रमे अर्चना व जिंगने जिंकल्यामुळे सामना सहाव्या गेमपर्यंत रंगला. अखेरीस सहावा व सातवा गेम जिंकून अर्चनाने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

मुलांमध्ये भारताच्या मानव ठक्करला जपानच्या तोमोकाजू हरिमोटोने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ४-१ असे पराभूत केल्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.

हा सामना फारच आव्हानात्मक होता. जिंगने अखेरच्या क्षणापर्यंत मला कडवी झुंज दिली. मात्र अखेरीस मीच विजयी झाल्यामुळे मेहनतीचे फळ मिळाले. उपांत्य फेरी गाठली असली तरी अंतिम फेरीत धडक मारून सुवर्णपदक मिळवण्याचेच माझे स्वप्न आहे.

– अर्चना कामत

भारतीय महिलांचा व्हानुअटूवर दणदणीत विजय

ब्यूनोस आयर्स : भारतीय महिला हॉकी संघाने (१८ वर्षांखालील) युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बुधवारी दमदार विजयाची नोंद केली. कमकुवत व्हानुअटू संघाचा भारताने चक्क १६-० गोलने धुव्वा उडवला. भारतातर्फे मुमताझ खानने सर्वाधिक चार तर चेतनाने तीन गोल केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने चेंडूवर वर्चस्व मिळवत आक्रमणावर भर दिला. आक्रमणपटू लार्लेमसिआमीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. ३० सेकंदांच्या अंतरात रीतने दुसरा गोल नोंदवला, तर पुढच्याच मिनिटाला कर्णधार सलिमा टेटेने संघासाठी तिसरा गोल करून चौथ्याच मिनिटाला व्हानुअटू संघाच्या बचावफळीच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

बलजीत कौरने पाचव्या मिनिटाला दोन गोल करत गोलफलक ५-० असा केला. चेतनाने सातव्या मिनिटाला तिचा पहिला गोल नोंदवला, तर रीतनेही त्याच मिनिटाला आणखी एक गोल करून भारताच्या खात्यात सातवा गोल जमा केला. मुमताझ (८) आणि लार्लेमसिआमीने (१०) गोल डागून  दोन्ही संघांतील गोलफरक वाढवला.

दुसऱ्या सत्रातही भारताने गोलधडाका सुरूच ठेवला. पहिल्या पाच मिनिटांच्या अंतरात मुमताजने अनुक्रमे ११, १२ आणि १५वा गोल झळकावला. तर सलिमा व चेतनाने १३ व १४वा गोल केला. इशिका चौधरीने अखेरच्या मिनिटाला भारतासाठी १६वा गोल केला.