टोक्यो : भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारी हिला बुधवारी कोरियाच्या १८ वर्षीय आन सान हिच्याकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेआधीच्या पात्रता फेरीमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्राथमिक फेरीत चौथे मानांकन मिळवलेल्या दीपिकाला दुसऱ्या मानांकित आन सान हिच्याविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. आन सान हिने मात्र शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत ही लढत ६-० अशा फरकाने जिंकली. बर्लिन येथे अलीकडेच झालेल्या विश्वचषकात दुहेरी सुवर्णपदके मिळवणाऱ्या आन सान हिने दीपिकाला अवघ्या एका गुणाने मागे टाकत पहिला सेट जिंकला होता.

कोरियाच्या आन सान हिने तीन वेळा १० गुणांचा वेध घेत दुसरा सेट २९-२५ असा खिशात घालत सुवर्णपदकावर नाव कोरले. ‘‘अंतिम फेरीपर्यंत मी चांगली कामगिरी केली होती. पण विजेतेपदासाठीच्या लढतीत माझ्याकडून अपेक्षेनुसार खेळ होऊ शकला नाही. अलीकडेच मी माझ्या तंत्रात बदल केला असल्यामुळे सूर सापडायला तसा वेळ लागणार आहे. येथून मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे, त्यामुळे भविष्यात माझ्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल. सामना हरल्यानंतर बाण मारतानाही मला अडचणी येत होत्या. मात्र मी त्यावर आता काम करत आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.

दीपिकाला पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी अद्याप आपले स्थान निश्चित करता आले नाही. याविषयी ती म्हणाली, ‘‘अशाच पद्धतीने माझी कामगिरी सुरू राहिली तर नक्कीच मी ऑलिम्पिकसाठी पात्र होईन. माझ्या खेळात सुधारणा होत असून मी पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकरिता जिवाचे रान करणार आहे. त्याचबरोबर माझ्या खात्यात ऑलिम्पिक पदकाची भर घालण्यासाठीही कठोर मेहनत घेणार आहे.’’ बँकॉक येथे २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेद्वारे दीपिकाने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या स्पर्धेत भारताच्या एल. बोंबाल्या देवी हिला दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या नूर अलिया घापर हिच्याकडून ५-६ असा निसटता पराभव पत्करावा लागला. भारताच्या कोमालिका बारी हिचे आव्हान अ‍ॅना स्टेपानोव्हा हिने पहिल्याच फेरीत ४-६ असे संपुष्टात आणले. पुरुषांमध्ये, अतनू दासला कोरियाच्या बे जेहयेऊन याच्याकडून दुसऱ्या फेरीत ४-६ अशी हार पत्करावी लागली. तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव हे पहिल्याच फेरीत पराभूत झाले.