शोकाकुल डी मारियाच्या पराक्रमामुळे अर्जेटिनाची चिलीवर मात

आजीने जग सोडल्याचे वृत्त अँजेल डी मारियाला तासाभरापूर्वी कळले होते. पण पॅरिस सेंट-जर्मेनच्या या दिग्गज फुटबॉलपटूचा आत्मविश्वास मुळीच ढळला नाही. लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अर्जेटिनासाठी त्याने प्रेरणादायी कामगिरी केली. त्यामुळेच कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत अर्जेटिनाला गतविजेत्या चिली संघाला २-१ असे नामोहरम करता आले.

मारियाने एक गोल केला आणि एका गोलसाठी साहाय्य केले. त्यामुळे दोनदा विश्वविजेतेपदे पटकावणाऱ्या अर्जेटिनाला चिलीच्या पराभवाचे उट्टे फेडता आले. गतवर्षी कोपा अमेरिका स्पध्रेच्या अंतिम फेरीत चिलीने अर्जेटिनाला हरवले होते.

डी मारियाने ५१व्या मिनिटाला अर्जेटिनाचे खाते उघडले. त्यानंतर शोकाकुल मारियाने सहकाऱ्यांनी आणलेली जर्सी आकाशाच्या दिशेने उंचावली. ‘‘आजी, तुझी सदैव उणीव जाणवेल!’’ अशा ओळी त्यावर लिहिल्या होत्या. मग ५८व्या मिनिटाला मारियाचे साहाय्य घेत एव्हर बनेगाने संघासाठी दुसरा गोल नोंदवला. त्यामुळेच मारियाचे नाव सामनावीर पुरस्कारासाठी निश्चित झाले.

‘‘मी हा सामना खेळायचे निश्चित केले होते. कारण मी राष्ट्रीय संघातून खेळायचो, याचा माझ्या आजीला अतिशय अभिमान वाटायचा,’’ असे डी मारियाने सामन्यानंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले व तो ढसाढसा रडू लागला.

डी मारियाच्या पराक्रमामुळे अर्जेटिनाने ३ गुण मिळवत ड-गटात अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांचे पनामा व बोलिव्हिया यांच्याविरुद्धचे सामने बाकी आहेत.

चिलीचा बदली खेळाडू जोस फ्युएनझालिडाने भरपाई वेळेत (९०+३व्या मिनिटाला) संघासाठी एकमेव गोल झळकावला.

लेव्हीज स्टेडियमवर झालेला हा सामना बदली खेळाडूंच्या बाकावरून मेस्सीला पाहावा लागला. कारण गेल्या महिन्यात होंडुरासविरुद्ध झालेल्या सामन्यात मेस्सीच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र बार्सिलोनाच्या या अव्वल खेळाडूची उणीव संघाला अजिबात भासली नाही. निकोलस गेटानचा अर्जेटिनाच्या आक्रमणात समावेश करण्यात आला. त्याने दुसऱ्याच मिनिटाला हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न करून आपली छाप पाडली.

अर्जेटिनाने प्रारंभीपासून सामन्यावर वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्र्या तासानंतर चिलीनेही आपल्या आक्रमणाची धार दाखवली. ३०व्या मिनिटाला अ‍ॅलेक्स सांचेझने गोल करण्याचा केलेला प्रयत्न अर्जेटिनाचा गोलरक्षक सर्जिओ रोमेरोने हाणून पाडला. सांचेझचा आणखी एक प्रयत्न रोमेरोने यशस्वी होऊ दिला नाही.

सामना सुरू व्हायला पाच मिनिटे बाकी असताना मारियाच्या आजीचे निधन झाल्याचे मला समजले. मात्र त्याने याविषयी गुप्तता बाळगणेच पसंत केले. तो खेळण्यासाठी सज्ज होता.

-गराडरे मार्टिनो , अर्जेटिनाचे प्रशिक्षक