अर्जेटिनाचा १-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश

जागतिक हॉकी लीग

घरच्या मैदानावर जागतिक हॉकी लीगमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न शुक्रवारी भंगले. गोन्झालो पिलेटने नोंदवलेल्या गोलमुळेच रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाने त्यांच्यावर १-० अशी मात केली. भारताला या स्पर्धेतील कांस्यपदक पटकावण्याची संधी असेल.

कलिंगा स्टेडियमवर भर पावसात झालेल्या या सामन्यातील एकमेव गोल गोन्झालोने १७ व्या मिनिटाला केला. भारताला सामन्याच्या सुरुवातीला दोन वेळा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. त्यामुळे पाऊस असतानाही उपस्थित राहिलेल्या शेकडो भारतीय चाहत्यांची निराशा झाली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या. तरीही खेळावर बराच वेळ अर्जेटिनाचेच वर्चस्व होते. त्यांच्या चालींमध्ये भेदकता होती. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची हुकमी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत गोन्झालोने अचूक फटका मारला व संघाचे खाते उघडले. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला भारताच्या मनप्रीतसिंगला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे दहा मिनिटे त्याला मैदानाबाहेर बसावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी आक्रमण केले, पण अचूकतेच्या अभावी त्यांना गोल नोंदवता आला नाही.

सामन्याच्या उत्तरार्धात भारताला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण त्याचा फायदा त्यांना मिळाला नाही. दोन्ही वेळा कमकुवत फटका मारत त्यांनी या संधी दवडल्या. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये भारतीय खेळाडूंनी सातत्याने आक्रमक चाली केल्या. पण दोन तीन वेळा त्यांनी मारलेले फटके गोलपोस्टवरून किंवा बाजूने गेले. दुर्दैवाने पेनल्टी कॉर्नर मिळविण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चुका कशा होतील, या दृष्टीनेही त्यांनी प्रयत्न केला नाही. अर्थात अर्जेटिनाच्या खेळाडूंनीही सावध खेळ केला. दीड मिनिट बाकी असताना त्यांना गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, पण त्यांनी ही संधी वाया घालविली.

नेदरलँड्सला सातवे  स्थान

नेदरलँड्सने इंग्लंडचा १-० असा पराभव करताना सातवे स्थान मिळवले. सातव्या आणि आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीतील एकमेव गोल  मिकरे प्रुइजसेरने ४२व्या मिनिटाला केला. त्यांनी आघाडी घेताना टिकवली. इंग्लंडला गोल करण्याची संधी होती मात्र त्यात त्यांना अपयश आले. नेदरलँड्सलाही आघाडी वाढवण्याची संधी होती.