News Flash

भारताची अर्जेंटिनाशी बरोबरी

पहिला सामना ३-४ असा गमावणाऱ्या अर्जेंटिनाने दुसऱ्या लढतीत मात्र जोमाने पुनरागमन करत बरोबरी पत्करली.

(संग्रहित छायाचित्र)

अर्जेंटिना हॉकी दौरा

गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाला अर्जेंटिना दौऱ्यातील दुसऱ्या सराव सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध ४-४ अशी बरोबरी पत्करावी लागली.

पहिला सामना ३-४ असा गमावणाऱ्या अर्जेंटिनाने दुसऱ्या लढतीत मात्र जोमाने पुनरागमन करत बरोबरी पत्करली. वरुण कुमार (सातव्या आणि ४४व्या मिनिटाला), राजकुमार पाल (१३व्या मिनिटाला) आणि रुपिंदर पाल सिंग (१४व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले. अर्जेंटिनाकडून लिआंड्रो टोलिनी (१०व्या मिनिटाला), लुकास टोस्कनी (२३व्या मिनिटाला), इग्नेसियो ऑर्टिझ (४२व्या मिनिटाला) आणि लुकास मार्टिनेझ (५७व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

‘‘पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच हा सामना रंगला. आम्ही गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. भारताला या संधीचे सोने करता आले नाही, अन्यथा चित्र वेगळे असते,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले.

भारताने पहिल्या सत्रातच ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. वरुण, राजकुमार आणि रुपिंदरपाल यांच्या गोलमुळे भारताने अर्जेंटिनावर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टीकॉर्नर मिळाले, पण त्यापैकी एकाचेही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अखेर २३व्या मिनिटाला टोस्कनी याने गोल करत ही पिछाडी २-३ अशी कमी केली. भारताने आक्रमक खेळ करून अर्जेंटिनाच्या गोलक्षेत्रात धडक मारूनही पाहुण्यांना गोल करता आले नाहीत.

ऑर्टिझने ४२व्या मिनिटाला अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिल्यानंतर दोन मिनिटांनी भारताला पेनल्टीकॉर्नर मिळाला. त्यावर वरुणने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना मार्टिनेझ याने गोल करत हा सामना ४-४ असा बरोबरीत सोडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:10 am

Web Title: argentina hockey tour india on par with argentina abn 97
Next Stories
1 भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक
2 शाहिद आफ्रिदी भडकला, IPL साठी मालिका अर्धवट सोडण्याची परवानगी दिल्याने आफ्रिका बोर्डावर संतापला
3 IPL मध्ये कोणत्याही संघाने नाही केलं खरेदी, हनुमा विहारी आता ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार
Just Now!
X