करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे भवितव्य अधांतरी

साओ पावलो : दक्षिण अमेरिकन राष्ट्रांत प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाचे भवितव्य अद्यापही अधांतरी आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्जेटिनातील सर्व क्रीडा क्षेत्र ठप्प पडले असून त्यांनी यजमानपदही गमावले आहे. त्यामुळे आता स्पर्धा दोन आठवडय़ांवर असताना दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ कोणती पावले उचलणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

१३ जून ते १० जुलैदरम्यान १० संघांत ही स्पर्धा होणार आहे. नियोजनाप्रमाणे कोलंबिया आणि अर्जेटिना येथे कोपा अमेरिकाचे आयोजन करण्यात येणार होती. मात्र दोन आठवडय़ांपूर्वीच कोलंबियाने यजमानपदाचू सूत्रे गमावली. तेथील राष्ट्रपतींच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू असल्यामुळे कोलंबियाने सामन्यांच्या आयोजनास नकार दिला.

त्यानंतर अर्जेटिनाचे पंतप्रधान अल्बटरे फर्नाडेज यांनी कोपा अमेरिका स्पर्धेचे पूर्ण आयोजन करण्यासाठी अर्जेटिना तयार असल्याचे सांगितले. मात्र गेल्या आठवडय़ात करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे तेथे ३१ मेपर्यंत सर्व फुटबॉल सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी स्थिती अधिक बिकट झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे अर्जेटिनाने दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाकडे स्पर्धेच्या आयोजनाबाबत नकार दर्शवला.

कोपा अमेरिका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन देश संयुक्तपणे सामन्यांचे आयोजन करणार होते. परंतु आता दोघांनीही माघार घेतल्यामुळे महासंघापुढे लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

गेल्या आठवडय़ाभरात अर्जेटिनात ३५ हजार करोना रुग्ण आढळले असून ५००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत येथे कोपा अमेरिका स्पर्धेचे आयोजन करणे अशक्य आहे.

-वाडो दे प्रेडो, अर्जेटिनाचे गृहमंत्री

गॅरेथ बेलवर वेल्स संघाची भिस्त 

लंडन : युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी वेल्सच्या २६ खेळाडूंचा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला असून अनुभवी आक्रमक गॅरेथ बेलवर वेल्सची प्रामुख्याने भिस्त असेल. २०१६च्या युरोमध्ये वेल्सने उपांत्य फेरी गाठली होती. ११ जूनपासून सुरू होणाऱ्या युरो चषकासाठी वेल्सचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्यांचे अनुक्रमे स्वित्र्झलड (१२ जून), टर्की (१६ जून) आणि इटलीशी (२० जून) सामने होतील. रुबिन कोलविलला प्रथमच वेल्सच्या संघात स्थान लाभले आहे.

रामोसला स्पेनच्या संघातून वगळले

माद्रिद : लुइस एन्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या स्पेनच्या संघातून जायबंदी सर्जिओ रामोसला वगळण्यात आले आहे. युरो चषकासाठी सोमवारी स्पेनच्या २४ खेळाडूंचा चमू निवडण्यात आला. ला लिगामधील रेयाल माद्रिद संघाचा कर्णधार असलेल्या रामोसला यंदाच्या हंगामात फारशी चमक दाखवता आली नाही. त्याशिवाय दुखापतीमुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले. स्पेनच्या संघात गोलरक्षक डेव्हिड डी गेआ, जॉर्डी अल्बा, प्रेडी, अल्वारा मोराटा, फेरान टोरेस यांसारख्या खेळाडूंचा समावेश असून त्यांना स्वीडन, पोलंड आणि स्लोव्हाकियाा यांच्यासह ‘ह’ गटात स्थान लााभले आहे.

विश्वचषक पात्रता सामने दुबईत 

बीजिंग : कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई देशांचे पात्रता सामने चीनऐवजी दुबईत खेळवण्यात येणार आहेत. मालदीव आणि सीरिया येथे करोना रुग्णांची संख्या वाढत असून तेथील प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे हे सामने दुबईत खेळवण्यात येतील, असे आशियाई फुटबॉल महासंघाने जाहीर केले. येत्या आठवडय़ात पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.