कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर

एएफपी, कार्टागेना (कोलंबिया)

लिओनेल मेसीच्या अर्जेटिना संघाला पुढील वर्षी होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ‘द सॉकरूज’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. ब्यूनस आयर्स येथे अर्जेटिना आणि चिली यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.

दक्षिण अमेरिकन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या गटवारीत सहयजमान अर्जेटिनासह ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, उरुग्वे, चिली आणि पेराग्वे यांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे, तर सहयजमान कोलंबियासह ब्राझील, कतार, व्हेनेझुएला, ईक्वेडर आणि पेरू यांचा ‘ब’ गटात समावेश आहे. या स्पर्धेसाठी यंदा ऑस्ट्रेलिया आणि कतार या दोन पाहुण्या संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्पर्धेची गटवारी

’  अ-गट : अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, उरुग्वे, चिली, पेराग्वे.

’  ब-गट : कोलंबिया, ब्राझील, कतार, व्हेनेझुएला, ईक्वेडर, पेरू.

तुम्हाला हे माहीत आहे का?

’  कोपा अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच दोन देश (कोलंबिया, अर्जेटिना) संयुक्त यजमानपद भूषवत आहेत.

’  १९९०पासून उत्तर अमेरिका आणि आशियाई खंडांमधून या स्पर्धेसाठी काही संघांना सहभागी करून घेतले जाते. येत्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला प्रथमच आणि कतारला दुसऱ्यांदा स्थान देण्यात आले आहे.

’  अर्जेटिना १०व्यांदा आणि कोलंबिया दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद सांभाळत आहे.