बोस्नियावर विजयासह दमदार सलामी देणाऱ्या अर्जेटिनाने आता इराणवर स्वारी करून त्यांचा पाडाव करण्याचे उद्दिष्ट जोपासले आहे. इराणविरुद्ध अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनी संघाच्या आक्रमणावर भरवसा ठेवत आघाडीपटूंना संघात सहभागी करून घ्यावे, असे मत अर्जेटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने व्यक्त केले आहे. क्लब स्तरावर दिमाखदार कामगिरी करणाऱ्या गोन्झालो हिग्युएनच्या समावेशाने अर्जेटिनाचा संघ बळकट झाला आहे. बोस्नियाविरुद्ध बदली खेळाडू म्हणून आलेल्या हिग्युएनला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळणार आहे. या लढतीत विजयासह बाद फेरीतील स्थान पक्के करण्याचा अर्जेटिनाचा इरादा आहे. हिग्युएन आणि सर्जिओ अ‍ॅग्युरो यांच्या बरोबरीने आक्रमणाची धुरा सांभाळायला आवडते, असे मेस्सीने म्हटले आहे. केवळ बार्सिलोनासाठी नव्हे तर अर्जेटिनासाठीही मी तेवढाच चांगला खेळ करतो, हे सिद्ध करण्याचा मेस्सीचा प्रयत्न आहे. झेव्हियर मॅस्कारेन्हो इराणविरुद्ध शंभरावा सामना खेळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे नायजेरियाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवणाऱ्या इराणसमोर अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाचे आव्हान आहे. रेझा घुचानछेडवर इराणची भिस्त आहे. बचावत्मक शैलीच्या खेळाचे इराणचे प्रशिक्षक कालरेस क्विरोझ यांनी समर्थन केले आहे. सामन्याचा आनंद घेत खेळल्यास निकाल आमच्या बाजूने लागेल असेही त्यांनी सांगितले.
सामना क्र. २७
‘फ’ गट : अर्जेटिना विरुद्ध इराण
स्थळ :  बेलो होरिझॉन्टे
सामन्याची वेळ : रात्री ९.३० वाजता