अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या तुफान फॉर्मात आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला आता एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. आता ‘फिफा’ विश्वचषकातील अर्जेटिनाच्या आशा मेस्सीच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहेत. एखादा खेळाडू एका वर्षांला ७० सामने खेळत असेल, तर त्याच्या तंदुरुस्तीवर परिणाम होणारच, असे उद्गार अर्जेटिनाला १९७८ मध्ये ‘फिफा’ विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू मारियो केम्प्स यांनी काढले.
ते म्हणाले, ‘‘अर्जेटिना संघासोबत खेळताना तो सध्या आनंदी आहे. संघातील सर्व खेळाडूंशी त्याने जुळवून घेतले आहे. अर्जेटिना संघात बरेचसे अव्वल खेळाडू आहेत. पण मेस्सीच्या कामगिरीवर अर्जेटिनाचे भवितव्य अवलंबून आहे. पण अमुक एखादा खेळाडू ‘फिफा’ विश्वचषक जिंकून देईल, असेही सांगता येणार नाही.’’
ब्राझीलच्या नेयमारची तुलना मेस्सीशी केली जात आहे, याबद्दल विचारले असता केम्प्स म्हणाले, ‘‘हे सध्या दोघेही एकाच संघातून खेळत आहेत. बार्सिलोनाच्या विजयात त्यांची भूमिका मोलाची ठरत आहे. पण नेयमारपेक्षा मेस्सी निश्चितच सरस आहे. ते दोघे एकमेकांच्या खेळाचा आदर करून एकमेकांच्या कामगिरीला दाद देतात.’’
घरच्या मैदानावरील प्रेक्षकांचे दडपण ब्राझीलच्या ‘फिफा’ विश्वचषकाच्या विजयात आड येणार आहे, असे केम्प्स यांना वाटते. पण ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या मते, ब्राझीलचा संघ या आव्हानासाठी सज्ज आहे.