सध्याच्या भारतीय संघातल्या बऱ्याच खेळाडूंचा सचिन तेंडुलकर हा आदर्श आहे, तसा तो कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही. त्यामुळे सचिनबद्दल बोलताना तो बऱ्याचदा लाजायचा, पण बुधवारी त्याने सचिनबद्दलचे स्पष्ट मत व्यक्त केले. सचिनने माझी २००७ च्या विश्वचषकाच्या कर्णधारपदी शिफारस केली असली तरी संघाची रणनीती ठरवताना माझे सचिनशी मतभेद व्हायचे, असे मत धोनीने व्यक्त केले आहे.
मैदानावर बऱ्याचदा मी आणि सचिनने सामन्याची रणनीती ठरवली आहे. त्यामध्ये त्याच्या मताशी मी कधी सहमत असायचो तर कधी मतभेदही व्हायचे, पण मी प्रामाणिक असायचो. सचिनने माझे नाव कर्णधारपदासाठी सुचवले आणि त्या प्रामाणिकपणाचे फळ मला मिळाले. त्याच्या मते मी फार कमी वेळामध्ये खेळातल्या काही गोष्टी आणि रणनीती शिकलो, असे धोनी ‘तेंडुलकर : दी क्रिकेटर ऑफ द कंट्री’ या दिल्लीतील पत्रकार विमल कुमार यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, जर मला कर्णधारपद दिले नसते, तरी सचिनने माझे नाव कर्णधारपदासाठी सुचवणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
सचिनबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल धोनी म्हणाला की, २०००-०१ किंवा २००१-०२ चा मोसम असेल, त्या वेळी दुलिप करंडकाचा सामना पुण्याला सुरू होता. मी पूर्व विभागाच्या संघात होतो आणि मैदानातील खेळाडूंना पाणी नेण्याचे काम राखीव असल्याने करीत होतो. त्या सामन्यात सचिनने १९९ धावा केल्या होत्या. सचिन खेळत असताना मी मैदानात पाणी घेऊन गेलो होतो. तेव्हा ‘मीही पाणी पिऊ शकतो का?’ असे सचिनने विचारले होते. ती माझी माझा आदर्शवत असलेल्या सचिनबरोबरची पहिली भेट होती. त्या वेळी माझ्या तोंडून एक अक्षरही फुटले नाही, सचिनला पाणी देऊन मैदानातून बाहेर पडलो.
तेंडुलकरबरोबरच्या पहिल्या संभाषणाबाबत विचारले असता धोनी म्हणतो, २००४ मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यात मी पहिल्यांदा सचिनशी बोललो. संघात माझे स्वागत करताना, तु कसा आहेस असा प्रश्न सचिनने मला विचारला. पाच दिवसानंतर तो दौरा संपला. त्या दौऱ्यात एक बैठक झाली होती. एका मोठय़ा गोल टेबलाच्या मध्यभागी सचिन बसला होता. दादा (सौरव गांगुली) आणि राहुलभाई (राहुल द्रविड) तिथे होते. या सगळ्यांसमोर उभं राहून भाषण कर असं मला सांगण्यात आलं.  
टीव्हीवर मी क्रिकेटचे सामने फारसे पाहत नाही पण अपवाद सचिनच्या फलंदाजीचा. तेंडुलकर फलंदाजी करत असेल तर मी आवर्जुन बघतो. ऑस्ट्रेलियात झालेल्या १९९२च्या विश्वचषकात तसेच भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात तेंडुलकर फलंदाजीला आल्यास मला झोपेतून उठवा असे वडिलांना सांगितल्याची आठवण धोनीने सांगितली.
 सुरुवातीला तेंडुलकरशी संवाद साधणे कठीण जात असे परंतु जसजसा वेळ गेला तसं सचिनशी सहजपणे बोलणे होऊ लागले असे धोनीने स्पष्ट केले. एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यापूर्वी सचिन मला लेगस्पिन टाकणार का ऑफ स्पिन याविषयी सांगत असे. काही वेळेला तो म्हणेल त्याला मी होकार देत असे, मात्र काही वेळा त्याच्याशी माझे मतभेद होत. यामुळे वावरताना, बोलताना असलेले  अवघडलेपण नाहीसे होत गेले. जेव्हा मी कर्णधार झालो तोपर्यंत सचिनशी मैदानावर मला सहजपणे संवाद साधता येऊ लागला. असेच  राहुल भाई (राहुल द्रविड),अनिल भाई (अनिल कुंबळे) किंवा लच्छू भाई (व्हीव्हीएस लक्ष्मण) यांच्याशी बोलतानाही असंच घडलं आहे. संघातील कोणालाही अहंकार नव्हता आणि ही भारतीय संघातली सर्वोत्तम गोष्ट आहे असे धोनीने सांगितले.
संपूर्ण संघ सचिनला ‘पाजी’ असे संबोधतो याबाबत विचारले असता, धोनीने गंमतीशीर आठवण सांगितली. संघातील सगळेच जण सचिनला ‘पाजी’ म्हणतात परंतु वेगवान गोलंदाज श्रीशांत सचिनला भैय्या म्हणतो असे धोनीने सांगितले. आदराप्रती आम्ही सचिनला पाजी म्हणतो.  
ग्वालियर येथे सचिनने साकारलेली द्विशतकी खेळी ही त्याची सवरेत्कृष्ट खेळी असल्याचे धोनीचे मत आहे. सचिनने जेव्हा द्विशतक झळकावले तेव्हा मी नॉन-स्ट्रायकर टोकाला हजर होतो. ही खेळी त्याची सर्वोत्तम खेळी आहे.  
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्याच्याशी तु कसा आणि कोणत्या गोष्टींवर संवाद साधशील, असे विचारल्यावर धोनी म्हणाला की,  निवृत्तीनंतर सचिनशी संवाद साधणे कठीण असेल. क्रिकेटच्या मैदानाबाहेर त्याच्याशी संवाद साधणे खरंच कठीण आहे. निवृत्तीनंतर त्याच्याशी आतासारखाच मैत्रीचे नाते जोपासणे अवघड असेल असे धोनीने सांगितले. मी त्याच्याशी गाडय़ा, बाइक्स यांच्याविषयी बोलू शकेन असे त्याने गमतीत सांगितले.
निवृत्तीनंतर काय करशील असे धोनीला विचारले असता, त्याने जम्मू काश्मीर तसेच पूर्वेत्तर राज्यांमध्ये सेनादलाबरोबर काम करायला आवडेल असे त्याने सांगितले. धोनीला भारतीय लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नल पदाने सन्मानित केले
होते.
याआधी मी जम्मू काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. मात्र मला फारसा वेळ मिळाला नाही. पण निवृत्तीनंतर मला लष्करासाठी काम करायला आवडेल. मी टीव्ही समालोचक होऊ शकत नाही. आकडय़ांची जंत्री मी लक्षात ठेवू शकत नाही. तंत्र विषयक मुद्यांवरही मला अडचणी येतील असे त्याने सांगितले.  पत्रकारांबरोबर तुझे नाते कसे आहे असे विचारले असता, धोनी म्हणाला, तुम्हा सगळ्यांवर माझे प्रेम असे मी म्हणणार नाही पण तुम्हा कोणाचाही मी तिरस्कार करत नाही असे मुत्सदी उत्तर धोनीने दिले.