१४ वर्षांखालील मुंबईच्या संघात अर्जुन तेंडुलकरची निवड
वडील आणि मुलगा स्थानिक संघाकडून एकाच वेळी विविध स्तरांवर खेळण्याच्या घटना तुरळक असल्या तरी सचिन आणि अर्जुन तेंडुलकर यांच्याबाबतीत मात्र ते घडताना दिसेल. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकीकडे मुंबईच्या रणजी संघाकडून खेळत असताना त्याचा मुलगा अर्जुन मुंबईकडूनच १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धेत खेळणार आहे. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर अर्जुनला संघात स्थान देण्यात आले आहे. एकीकडे सचिन उपान्त्य फेरीत जेव्हा सेनादलाशी दोन हात करत असेल तेव्हा अर्जुन अहमदाबामध्ये पश्चिम विभागीय स्पर्धा खेळत असेल.
सचिन उजव्या हाताने फलंदाजी करत असला तरी अर्जुन मात्र डावखुरा फलंदाज आहे. सचिनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटविश्वात अनेक मैलाचे दगड गाठले आहेत, अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुनही विश्वविक्रमांचा वेध घेणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
मुंबईचा १४ वर्षांखालील संघ : अर्जुन तेंडुलकर, आकाश सावला, वैष्णव नार्वेकर, ओमकार रहाटे, अग्नी चोप्रा, हशिर दफ्तरदार, जय दवे, यश जोशी, दर्शन पडारे, तनुष कोटियन, आझिम शेख, अभिषेक शेट्टी, द्रुव वेदक, मानस राईकर आणि जहांगिर अन्सारी.