मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये आज सोमवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने अष्टपैलू कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाकडू खेळताना अर्जुन तेंडुलकरनं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपलं योगदान देत विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

आकाश टायगर्स आणि नॉर्थ मुंबई पँथर्स यांच्यात सोमवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये अर्जुनने गोलंदाजी करताना तीन षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. तर फलंदाजी करताना २० चेंडूत झटपट नाबाद २५ धावाची खेळी केली.

सोमवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडूलकरच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने विजय मिळवला. मुंबई पँथर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा केल्या होत्या. मुंबई पँथर्सकडून कर्णधार विक्रांत औटीनं ५२ तर विशाल धागांवकरने ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तर दाखल आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने १९.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा करत सहा गड्यांनी सामना जिंकला.