आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेटच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने छोट्या वयात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या क्रिकेट करिअरच्या टप्प्यात महत्वाची स्पर्धा ठरु शकणाऱ्या मुंबई टी-२० लीगमधून माघार घेण्याचा निर्णय अर्जुनने घेतल्याचं समजतंय. ११ ते २१ मार्चदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असून खुद्द सचिन तेंडुलकर या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे.

सुरुवातीला अर्जुन तेंडुलकर या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र सचिन तेंडुलकरशी चर्चा केल्यानंतर अर्जुनने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. अर्जुनचे प्रशिक्षक त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर सध्या मेहनत घेत असून, मोठ्या पातळीवरील सामन्यांमध्ये खेळण्यासाठी अर्जुन तयार नसल्याचं मत प्रशिक्षकांनी व्यक्त केलंय. मात्र अर्जुन तेंडुलकरच्या माघार घेण्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांपुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईचे काही महत्वाचे खेळाडू हे सध्या देवधर चषक आणि इराणी चषकासाठी सराव करत आहेत. तर अन्य खेळाडू हे श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी तयार होतायत. त्यामुळे स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन सध्या आयोजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन, प्रोबॅबिलिटी स्पोर्ट्स आणि विझक्राफ्ट यांनी एकत्र येऊन ही लीग सुरू केली आहे. या स्पर्धेत मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे सहा संघ तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1500 क्रिकेटपटूंनी नावं नोंदवली आहेत. त्यातून सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली जाणार आहे. एकेकाळी ‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या मुंबईला गतवैभव पुन्हा मिळावं, हा या लीगच्या आयोजनामागचा हेतू आहे.