भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि मैदानात अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या सचिन तेंडुलकरची पुढची पिढी क्रिकेटच्या मैदानात येणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची भारताच्या U-19 संघात निवड करण्यात आलेली आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी अर्जुनची निवड करण्यात आलेली आहे.

जुलै महिन्यात भारताचा १९ वर्षाखालील संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन ४ दिवसीय कसोटी सामने आणि ५ वन-डे सामने खेळणार आहे. अर्जुन तेंडूलकरची या दौऱ्यात कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. मात्र वन-डे संघात स्थान मिळवायला त्याला जमलेलं नाहीये. आशिष कपूर, ज्ञानेंद्र पांडे, राकेश पारिख यांच्या निवड समितीने अर्जुन तेंडूलकरची संघात निवड केलेली आहे. या दौऱ्यातील कसोटी संघाचं नेतृत्व दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतकडे देण्यात आलेलं आहे. तर वन-डे संघाचं नेतृत्व आर्यन जुयाल याच्याकडे देण्यात आलंय.