काही दिवसांपुर्वीच भारताच्या १९ वर्षाखालील संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची निवड करण्यात आली होती. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात २ कसोटी सामन्यांसाठी (४ दिवसीय) अर्जुन तेंडुलकरची संघात निवड करण्यात आली होती. यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी या निवडीचं स्वागत केलं तर काहींनी या निर्णयावर टीकाही केली. काही लोकांनी अर्जुन हा सचिनचा मुलगा असल्यामुळे त्याची संघात निवड झालेली असल्याचं म्हटलं. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक सनथ कुमार यांनीही अर्जुनला संघात कोणत्याही प्रकारे विशेष वागणूक मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं.

स्थानिक पातळीवर प्रशिक्षणात नाव कमावलेल्या सनथ कुमार यांची भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जुनच्या संघात निवडीबद्दल प्रश्न विचारला असता, सनथ कुमार यांनी त्याच्यावर थेट भाष्य करणं टाळलं…मात्र कोणत्याही प्रशिक्षकासाठी सर्व खेळाडू हे एकसमानच असतात. कोणत्याही खेळाडूला विशेष वागणूक मिळणार नसल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं. “अर्जुन हा माझ्यासाठी इतर खेळाडूंप्रमाणेच असणार आहे. प्रत्येक खेळाडूंमधलं कौशल्य तपासून त्याचा संघाला कसा फायदा होईल हे पाहणं माझं काम असणार आहे.” पीटीआयशी बोलताना कुमार बोलत होते.

याआधी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आसामच्या संघाने रणजी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. याचसोबत आंध्र प्रदेशच्या संघाने विजय हजारे चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या कामगिरीच्या जोरावर सनथ कुमार यांची भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या दौऱ्यात भारताचा संघ सनथ कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.