भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ३१ वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे. अर्जुन पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर इशांतने युएईमधून खास प्रतिक्रिया दिली. गेल्या १३ वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला. माझा पूर्ण परिवार आणि विशेषकरुन माझी पत्नी प्रतिमाला याचा खूप आनंद झाल्याचं इशांत म्हणाला.

इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याव्यतिरीक्त भारतीय वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माची मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. “ज्यावेळी मला अर्जुन पुरस्कार मिळणार आहे हे समजलं त्यावेळी मला खूप आनंद झाला. गेली १३ वर्ष मी मेहनत घेतो आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण परिवारासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.” इशांतचा आभार मानतानाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलाय.

आपल्यापेक्षा आपली पत्नी या पुरस्काराने आनंदी असल्याचं इशांत म्हणाला. २००७ साली भारतीय संघात पदार्पण केलेल्या इशांतने आतापर्यंत ९७ कसोटी आणि ८० वन-डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.