मुंबईचा धडाकेबाज प्रारंभ
अरमान जाफरने नाबाद शतक झळकावताना विक्रांत औटीच्या साथीने अखंडित द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळेच मुंबईला महाराष्ट्रविरुद्धच्या सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत पहिल्या डावात २ बाद ३३९ अशी भक्कम धावसंख्या रचता आली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमीच्या मैदानावर या सामन्याला शुक्रवारी प्रारंभ झाला. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जाफरचे तडाखेबाज शतक व त्याने औटीबरोबर केलेली २६४ धावांची नाबाद भागीदारी हे मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. जाफरने नाबाद १६३ धावा करताना २२ चौकार व तीन षटकार अशी फटकेबाजी केली. औटीने २०३ चेंडूंमध्ये संयमपूर्ण खेळ करीत नाबाद ९१ धावा केल्या. यात त्याने नऊ चौकार मारले. आकर्षित गोमेल (२९) व जे. जी. बिश्त यांनी सलामीसाठी ७४ धावा करीत मुंबईला समाधानकारक सुरुवात करून दिली. महाराष्ट्राकडून दोन्ही बळी सत्यजित बच्छावने घेतले, मात्र त्यासाठी त्याला ११५ धावा मोजाव्या लागल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत २ बाद ३३९ (अरमान जाफर खेळत आहे १६३, विक्रांत औटी खेळत आहे ९१)