16 December 2017

News Flash

होय! मी अपराधी आहे – आर्मस्ट्राँग

उत्तेजक औषधे सेवनाबाबत मी खरोखरीच अपराधी आहे. मी शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अशी औषधे घेतली

पी.टी.आय, शिकागो | Updated: January 19, 2013 2:01 AM

उत्तेजक औषधे सेवनाबाबत मी खरोखरीच अपराधी आहे. मी शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अशी औषधे घेतली त्यामध्ये मला काहीही गैर वाटत नाही, असे अमेरिकेचा ज्येष्ठ सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याने जाहीर मुलाखतीत कबूल केले.
आर्मस्ट्राँग हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. सुरुवातीस त्याने आपण निदरेष असल्याचे सांगितले होते मात्र ओपरा विनफ्री यांच्या वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण उत्तेजक घेतल्याची कबुली दिली. गतवर्षी अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीने आर्मस्ट्राँग हा उत्तेजक औषधे सेवन प्रकरणी दोषी असल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा आधार घेत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाने आर्मस्ट्राँगने १९८८ पासून केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले होते. तो दोषी आढळल्यामुळे त्याने १९९९ ते २००५ या कालावधीत टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यतीची सातही विजेतेपदे त्याच्याकडून काढून घेण्यात आली आहे. तसेच त्याने २००० मध्ये मिळविलेले ऑलिम्पिक कांस्यपदकही रद्द करण्यात आले आहे.
उत्तेजक औषधांखेरीज टूर-डी-फ्रान्स शर्यत जिंकणे अशक्य आहे असे सांगून आर्मस्ट्राँग म्हणाला, हा खूप काही मोठा गुन्हा मी केला आहे असे मला वाटत नाही. मी इतरांना फसविले आहे असेही मला वाटत नाही. सर्वच अव्वल दर्जाचे खेळाडू उत्तेजकाचा आधार घेतात. मी जर २००९ मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पुनरागमन केले नसते तर उत्तेजक घेण्याच्या आरोपात मी सापडलो नसतो. उत्तेजक हा खेळाचाच एक भाग आहे असे मी मानतो. याबद्दल मी कोणासही दोषी ठरविणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केल्यानंतर २००९ व २०१० मध्ये मी टूर-डी-फ्रान्स शर्यतीत भाग घेतला होता त्यावेळी मी कोणत्याही उत्तेजक औषधाचे सेवन केले नव्हते तसेच संघातील अन्य खेळाडूंवरही उत्तेजक औषधे घेण्याची जबरदस्ती केली नव्हती असेही आर्मस्ट्राँगने सांगितले.

आर्मस्ट्राँगवर लिव्हस्ट्राँग नाराज
आर्मस्ट्राँगने उत्तेजकाबाबत कबुली देत आपल्या अपराधाचा पाढाच वाचला आहे मात्र त्याच्या या कृत्यामुळे त्याने आमच्या संस्थेस व अन्य चाहत्यांची घोर फसवणूक केली आहे असे कर्करोगग्रस्त लोकांना मदत करणाऱ्या लिव्हस्ट्राँग या संस्थेने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. कर्करोगाशी लढा देत सायकलिंग क्षेत्रात महान कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला होता. आम्हास त्याच्याबद्दल केवढा अभिमान होता मात्र त्याच्या कबुलीजबाबानंतर त्याच्यावरील आमचा विश्वासच उडाला आहे, असेही या संस्थेने म्हटले आहे.

आर्मस्ट्राँगची कबुली योग्यच!
आर्मस्ट्राँगने उत्तेजक औषधे घेतल्याची कबुली देत योग्यच कृत्य केले आहे, असे अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रेव्हिस टायगार्ट यांनी सांगितले. ते म्हणाले, आर्मस्ट्राँगने सुरुवातीस आम्ही त्याला बदनाम करण्याचा कट करीत असल्याचे म्हटले होते. त्याने आमच्यावर सतत टीका केली होती आता मात्र अपराधाची कबुली देत त्याने आपल्या पायावरच हातोडा मारून घेतला आहे. त्याच्यापासून अन्य खेळाडूंनी धडा शिकला पाहिजे. जर त्याला खरोखरीच आपल्या अपराधाचा पश्चाताप होत असेल तर त्याने शपथ घेत आतापर्यंत केलेल्या गुन्ह्य़ांची स्पष्टपणे कबुली द्यावी.

First Published on January 19, 2013 2:01 am

Web Title: armstrong admits doping im a flawed character
टॅग Armstrong