News Flash

अरनॉल्ड महाराष्ट्रात येतोय!

शरीरसौष्ठव म्हटले की पहिल्यांदाच त्याचा चेहरा डोळ्यांपुढे तरळून आल्याशिवाय राहत नाही.. त्याच्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी जगावर होती आणि अजूनही ती तशीच कायम आहे.. शरीरसौष्ठवपटूंसाठी तर

| April 20, 2013 04:08 am

शरीरसौष्ठव म्हटले की पहिल्यांदाच त्याचा चेहरा डोळ्यांपुढे तरळून आल्याशिवाय राहत नाही.. त्याच्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी जगावर होती आणि अजूनही ती तशीच कायम आहे.. शरीरसौष्ठवपटूंसाठी तर तो देव, आदर्श, अनेकांच्या गळ्यातील ताईत आणि या खेळाचा अनभिषिक्त सम्राट अन् राजदूतही.. आपल्या अद्भूत, अप्रतिम शरीरयष्टीच्या जोरावर तब्बल सात वेळा ‘मि. ऑलिम्पिया’ ठरलेला आणि चार वेळा ‘मि. युनिव्हर्स’ या किताबाला गवसणी घालणारा तमाम क्रीडा चाहत्यांचा ‘आयकॉन’ असलेला अरनॉल्ड श्वेझनेगर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात येणार आहे. ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात ‘मि. ऑलिम्पिया’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अरनॉल्ड या स्पर्धेला उपस्थित राहणार आहे.
जागतिक शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्या लोभस शरीर संपदेच्या जोरावर अरनॉल्डच्या नावावर बरेच विश्वविक्रम आहेत. या विश्वविक्रमाच्या जवळपास आतापर्यंत कोणालाही जाता आलेले नाही. जागतिक स्तरावर विश्वविक्रम रचल्यावर अरनॉल्डने हॉलीवूडपटांमध्येही आपला ठसा उमटवला. त्यानंतर राजकारणातही त्यांने प्रवेश घेत राज्यपाल पदापर्यंत मजलही मारली. सध्या अरनॉल्ड खेळत नसला तरी ‘अरनॉल्ड क्लासिक ’ या स्पर्धेचे आयोजन करतो. यामध्ये शरीरसौष्ठवाबरोबर बऱ्याच खेळांचा समावेश करण्यात येतो. एका तपाहून अधिक काळ अरनॉल्ड या स्पर्धा भरवत आहे.
याबद्दल आशियाई शरीरसौष्ठव आणि फिटनेस महासंघाचे सरचिटणीस संजय मोरे म्हणाले की, ‘‘अरनॉल्ड म्हणजे शरीरसौष्ठवमधील दैवत. त्याला पाहून, त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत बऱ्याच पिढय़ा घडल्या आहेत. त्यामुळे त्याला जर भारतात आणले तर या खेळाकडे युवा वर्ग मोठय़ा प्रमाणात आकर्षित होईल, असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर खेळाच्या प्रसार आणि प्रचारालाही याचा चांगला फायदा होईल. आपल्या देशातील लोकांना अरनॉल्डला प्रत्यक्ष पाहण्याची ही चांगली संधी असेल. ५ ऑक्टोबरला आम्ही ‘मि. ऑलिम्पिया’ ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये घेत आहोत. मुंबई किंवा पुणे या दोन पैकी एका शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा आमचा विचार आहे. आम्ही अरनॉल्डला याबाबत विचारल्यावर तो लगेचच तयार झाला. ‘भारतात यायला मला नक्कीच आवडेल’ अशी त्याची पहिली प्रतिक्रिया होती.’’
अरनॉल्ड भारतात आल्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहे. या दरम्यान त्याची क्रीडा मंत्र्यांशी भेट होण्याची शक्यता आहे. खेळांच्या विकासासाठी अरनॉल्ड ऑक्टोबरमध्ये भारतात येणार असून देशवासियांसाठी ही एक अभूतपूर्व अशी पर्वणीच असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2013 4:08 am

Web Title: arnold schwarzenegger comming in maharashtra
टॅग : Sports
Next Stories
1 सिंधूचे आव्हान संपुष्टात
2 मासा आघाडीवर.. फेरारी सुसाट!
3 एकजुटीचा विजय असो!
Just Now!
X