विश्वविजेतेपद गमवावे लागल्यानंतर भारताच्या विश्वनाथन आनंदची पराभवाची साडेसाती संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या आनंदला झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
अरोनियनने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना इंग्लिश ओपनिंग पद्धतीने डावाची सुरुवात केली. अरोनियनने वजिराच्या साहाय्याने आनंदवर सातत्याने दडपण आणण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या मध्यात आनंदने केलेल्या चुका त्याला चांगल्याच भोवल्या. आनंदने तीन प्यादांचा बळी देऊन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने नंतर अरोनियनवर प्रतिहल्लेही चढवले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर आनंदने ७३ चालींनंतर पराभव मान्य केला. सहा खेळाडूंच्या स्पर्धेत विजेत्याला दोन गुण मिळणार असल्यामुळे आनंदला हा पराभव महागात पडणार आहे.
तांत्रिक मुद्दय़ांवर आनंद अजूनही चाचपडत असून यावर त्याला लवकरच तोडगा काढावा लागणार आहे. या स्पर्धेतील क्लासिकल प्रकाराच्या चार फेऱ्या शिल्लक असून नंतर झटपट पद्धतीने पाच फेऱ्यांचा डाव रंगणार आहे. पहिल्या फेरीनंतर आनंद आणि गेल्फंडला गुणांचे खाते खोलता आलेले नाही. इस्रायलच्या बोरिस गेल्फंडवर विजय मिळवणारा नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि अरोनियन दोन गुणांसह अग्रस्थानी आहेत. अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि इटलीचा फॅबियानो कारुआना यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. या दोघांचेही प्रत्येकी एक गुण झाले आहेत.