लंडन : आर्सेनलने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये शनिवारी मध्यरात्री चेल्सीवर ३-१ असा विजय मिळवला. जवळपास दोन महिन्यांतील आर्सेनलचा हा पहिला विजय ठरला.

अलेक्झांडे लाकाझेट्टे याने ३५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरीस ग्रॅनिट झाका याने फ्री-किकवर अप्रतिम गोल करत आर्सेनलला २-० अशा आघाडीवर आणले. बुकायो साका याने ५६व्या मिनिटाला तिसऱ्या गोलची भर घालत आर्सेनलला मोठी आघाडी मिळवून दिली. अखेर चेल्सीने चॅमी अब्राहमच्या (८५व्या मिनिटाला) गोलमुळे सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अतिरिक्त वेळेत चेल्सीला पेनल्टी-किक मिळाली. पण जॉर्गिन्योने मारलेला फटका आर्सेनलचा गोलरक्षक बेर्नार्ड लेनो याने अडवला. आर्सेनलने या मोसमातील खराब सुरुवातीनंतर १४वे स्थान प्राप्त केले आहे. चेल्सी मात्र २५ गुणांसह सातव्या स्थानी आहे.

मँचेस्टर सिटीचा सहज विजय

इकाय गुंडोजेन आणि फेरान टोरेस यांनी केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने न्यूकॅसलचे आव्हान २-० असे सहज मोडीत काढले. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत २६ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. रहिम स्टर्लिगच्या पासवर गुंडोजेनने १४व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीला आघाडीवर आणले. त्यानंतर टोरेसने ५५व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीसाठी दुसरा गोल लगावला.

एव्हर्टन दुसऱ्या स्थानी

गिल्फि सिगर्डसन याने केलेल्या एकमेव गोलमुळे एव्हर्टनने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शेफिल्ड युनायटेडचा १-० असा पाडाव केला. आइसलँडचा मध्यरक्षक असलेल्या गिल्फिने गोलरक्षक आरोन रामसदाले याला चकवून ८०व्या मिनिटाला हा गोल झळकावला. या विजयामुळे एव्हर्टनने २९ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. लिव्हरपूल ३१ गुणांसह अग्रस्थानी आहे.