न्यूकॅसल युनायटेडला नमवून गुणतालिकेत अव्वल; किशिएलनीचा निर्णायक गोल

लेईस्टर आणि आर्सेनल यांच्यात इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरुन रंगणारी स्पर्धा संपण्याचे नाव घेत नाही. शनिवारी झालेल्या सामन्यात आर्सेनलने न्यूकॅसल युनायटेडवर १-० असा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. २० सामन्यांत आर्सेनलच्या खात्यात ४२ गुण जमा झाले आहेत, तर लेईस्टर दोन गुणांनी पिछाडीवर आहे. शनिवारच्या या लढतीतील पराभवामुळे मात्र न्यूकॅसलला (१७) अठराव्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. मात्र, त्यांनी आर्सेनलला दिलेली टक्कर कौतुकास्पद होती.

इमिरेट्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दोन्ही क्लबमधील सामना चांगला अटीतटीचा झाला. तिसऱ्याच मिनिटाला आर्सेनला गोल करण्याची संधी चालून आली, परंतु न्यूकॅसलच्या बचावासमोर ते अपयशी ठरले. सुरुवातीपासूनच झालेल्या आक्रमक खेळामुळे न्यूकॅसलने आपला बचाव अधिक भक्कम करत तगडय़ा आर्सेनलला पहिल्या सत्रात गोलशून्यवर समाधान मानणे भाग पाडले. दुसऱ्या सत्रातही हीच झुंज पाहायला मिळाली. ७२व्या मिनिटाला अखेरीस लौरेंट किशिएलनीने न्यूकॅसलचा बचाव भेदून आर्सेनलसाठी विजयी गोल केला. मेसूट ओझीलने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू अचूक हेरून ऑलिव्हर गिराऊडने किशएलनीकडे सोपवला.

वेस्ट हॅम अव्वल पाचात; लिव्हरपूलचा पराभव

मिचेल अँटोनियो व अँडी कॅरोल यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर वेस्ट हॅम क्लबने लंडन येथील बोलेईन मैदानावर झालेल्या सामन्यात बलाढय़ लिव्हरपूलचा २-० असा पराभव करताना अव्वल पाच क्लबमध्ये प्रवेश केला.