अर्सेनलने या मोसमात सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत लिव्हरपूलचा २-० असा पाडाव केला. या विजयासह अर्सेनलने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखून जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे.
घरच्या मैदानावर झालेल्या दोन सामन्यांत अर्सेनलला बोरूसिया डॉर्टमंड आणि चेल्सीकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. अर्सेनलला अव्वल स्थानावरून हुसकावून लावण्याचे मनसुबे लिव्हरपूलने आखले होते. पण सान्ती काझोर्लाने १९व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत अर्सेनलला आघाडीवर आणले. त्यानंतर आरोन रामसे यांने ५९व्या मिनिटाला २० यार्डावरून गोल करत अर्सेनलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रामसेचा हा या मोसमातील १०वा गोल ठरला. लुइस सुआरेझने लिव्हरपूलसाठी दोन वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्याला गोल करण्यात अपयश आले.
मँचेस्टर युनायटेडने विजयी कामगिरीत सातत्य राखत फुलहॅमवर ३-१ असा विजय मिळवून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अँटोनियो व्हॅलेन्सिया (नवव्या मिनिटाला), रॉबिन व्हॅन पर्सी (२०व्या मिनिटाला) आणि वेन रूनी (२२व्या मिनिटाला) यांनी सुरुवातीलाच गोल करत युनायटेडला सामन्यावर पकड मिळवून दिली होती. अलेक्झांडर काकानिकिलिच याने ६५व्या मिनिटाला गोल करून फुलहॅमसाठी लढत दिली. या विजयासह युनायटेडने गुणतालिकेत आठवे स्थान पटकावले. मँचेस्टर सिटीने नॉर्विच सिटीचा ७-० असा धुव्वा उडवत चौथ्या स्थानावर मजल मारली. मँचेस्टर सिटीकडून ब्रॅडले जॉन्सन (स्वयंगोल), डेव्हिड सिल्व्हा, माजिता नास्तासिक, अल्वारो नेग्रेडो, याया टौरे, सर्जीओ अ‍ॅग्युरो आणि एडिन झेको यांनी गोल केले. चेल्सीला न्यूकॅसलकडून ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. टॉटनहॅम हॉट्सपरने हल सिटीचा १-० असा पराभव केला.