दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत आरोन रामसे याने केलेल्या गोलाच्या बळावर अर्सेनलने इंग्लिश प्रीमिअर लीगची शानदार सुरुवात केली. रामसेच्या या गोलमुळे अर्सेनलने १० जणांसह खेळणाऱ्या क्रिस्टल पॅलेसवर २-१ असा सनसनाटी विजय मिळवला.
२००४नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचे स्वप्न बाळगणाऱ्या अर्सेनलने निराशाजनक सुरुवात केली होती. ब्रेडे हँगेलँडने ३५व्या मिनिटाला गोल करून क्रिस्टल पॅलेसला आघाडीवर आणले होते. पण पहिल्या सत्राच्या अखेरीस लॉरेन्ट कोसिएल्नी याने गोल करून सामन्यात बरोबरी साधली. दोन पिवळी कार्ड दाखवल्यामुळे क्रिस्टल पॅलेसच्या जेसन पंचेन याला मैदान सोडावे लागले. याचा फायदा उठवत रामसेने अतिरिक्त वेळेच्या पहिल्या मिनिटाला गोल करून अर्सेनलला विजयी सलामी नोंदवून दिली.
लिव्हरपूलचा साउदम्प्टनवर विजय
रहीम स्टर्लिग आणि डॅनियल स्टरिज यांनी झळकावलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने  साउदम्प्टनचे आव्हान २-१ असे परतवून लावले. २३व्या मिनिटाला स्टर्लिगने लिव्हरपूलचे खाते खोलल्यानंतर दुसऱ्या सत्रात साउदम्प्टनने कडवी लढत देत जोमाने पुनरागमन केले. नॅथेनायल क्लायन याने ५६व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर मात्र डॅनियल स्टरिजने ७९व्या मिनिटाला शानदार गोल साकारत लिव्हरपूलच्या विजयावर मोहोर उमटवली.