इंग्लिश फुटबॉल विश्वातली मानाची स्पर्धा असणाऱ्या एफए चषक स्पर्धेच्या जेतेपदावर आर्सेनलने मोहोर उमटवली. अंतिम लढतीत आर्सेनलने अ‍ॅस्टॉन व्हिलाचा ४-० असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या विक्रमी १२व्या जेतेपदाची कमाई केली.
या विजयासह आर्सेनलचे व्यस्थापक आर्सेन वेगंर आधुनिक काळातील सर्वाधिक यशस्वी व्यवस्थापकांच्या मांदियाळीत स्थान पटकावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना आर्सेनलने १९पैकी सहावेळा जेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी अंतिम लढतीत दोन गोलनी पिछाडीवर असतानाही आर्सेनलने हल सिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला होता. यंदा अ‍ॅस्टॉन व्हिलावर दणदणीत विजयासह आर्सेनलने जेतेपद आपल्याकडेच कायम राखले.
सुरुवातीच्या टप्प्यात आर्सेनलने चेंडूवर नियंत्रण राखले. मात्र, व्हिलाच्या बचावाच्या तटबंदीमुळे त्यांना गोल करता आला नाही. हातून झालेल्या चुकांचाही त्यांना फटका बसला. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना थिओ वॉलकॉटने आर्सेनलचे खाते उघडले. डाव्या पायानिशी वॉलकॉटने सुरेख गोल केला. मध्यंतरानंतर पाचच मिनिटांत सँचेझने गोल करत आर्सेनलला आघाडी मिळवून दिली. पीटर मर्टेसॅकरने गोलपोस्टच्या अगदी जवळून शिताफीने गोल करत आर्सेनलची आघाडी बळकट केली. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात बदली खेळाडू म्हणून आलेल्या ऑलिव्हिर गिरोडने झटपट गोल करत आर्सेनलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह आर्सेनलने पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत स्थान पटकावले आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेची पात्रता फेरीत आता आम्हाला खेळण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आमच्याकडे तयारीसाठी बराच कालावधी आहे. या जेतेपदामुळे आमच्यातील आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचे आमचे पुढील लक्ष्य असेल.
– आर्सेन वेंगर, आर्सेनल संघाचे प्रशिक्षक