News Flash

अर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा

२२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अर्सेनल संघाचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर या पदावरून पायउतार होत आहेत

अर्सेनल संघाचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर

२२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला हंगामाअखेरीस पूर्णविराम मिळणार

लंडन : २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अर्सेनल संघाचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर या पदावरून पायउतार होत आहेत. चालू मोसम संपल्यानंतर    प्रशिक्षकपद सोडणार आहे, अशी घोषणा वेंगर यांनी केली.

‘‘इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी मला अर्सेनलचे प्रशिक्षकपद सांभाळता आले, याचा मला अभिमान वाटतो,’’ असे वेंगर यांनी म्हटले आहे. तीन प्रीमियर लीगचे विजेतेपद तसेच २००३-०४च्या मोसमात अपराजित राहण्याची कामगिरी आणि सात वेळा एफए चषक पटकावण्याची करामत त्यांच्या कारकिर्दीत संघाने केली आहे.

मात्र अर्सेनलला गेली १४ वर्षे प्रीमियर लिगचे विजेतेपद पटकावता न आल्याने वेंगर यांच्यावरील दडपण वाढले होते. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा पात्रतेचा अडसर ओलांडता न येण्याची टांगती तलवार त्यांच्यावर होती. स्पेनचा मातब्बर संघ अ‍ॅटलेटिको माद्रिदला २७ एप्रिल आणि ४ मेच्या युरोपा लिगच्या उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतरच अर्सेनलला ते शक्य होणार आहे.

‘‘अर्सेनलने सर्वोत्तम कामगिरी करावी, या उद्देशाने सर्व चाहत्यांनी संघाचे समर्थन करावे. अर्सेनलच्या चाहत्यांनी संघाच्या मूल्यांना नेहमीच महत्त्व दिले आहे,’’ असेही वेंगर यांनी नमूद केले आहे.

अर्सेनल संघाचे प्रमुख भागधारक असलेल्या स्टॅन क्रोएन्के यांनी अर्सेनल यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीला सलाम केला आहे. २०११पासून अर्सेनल संघात त्यांचा सर्वाधिक हिस्सा आहे. दरम्यान, वेंगर यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचेही क्रोएन्के यांनी म्हटले आहे.

वेंगर यांनी १९९६ साली क्लबचा पदभार स्वीकारल्यानंतर खेळाडूंच्या आहारात आमूलाग्र बदल केले. तसेच ज्यामुळे संघ अपयशी ठरत होता, अशा पेयपानाच्या बाबींवरदेखील नियंत्रण आणले होते. त्यानंतर १९९७-९८ च्या मोसमातच त्याचे परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला. त्या मोसमातच अर्सेनलने मॅँचेस्टर युनायटेडसारख्या बलाढय़ संघाला पराभूत करून लीगचे विजेतेपद पटकावले होते. २००३ -०४ साली अर्सेनलने सर्वोत्तम कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर आतापर्यंत फारसे यश न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत चालले होते.

क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतर पायउतार होण्याची ही योग्य वेळ असल्याची जाणीव झाली. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.

– अर्सेन वेंगर, अर्सेनलचे प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:15 am

Web Title: arsene wenger to step down as arsenal manager will leave club at end of the season
Next Stories
1 डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली
2 युवा ऑलिम्पिक २०२६ च्या यजमानपदासाठी भारत उत्सुक
3 आता मनिकाच्या खांद्यावर भारताची जबाबदारी!
Just Now!
X