गेल्या पाच दशकांपासून सायकलिंग क्षेत्रात खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटक अशा तिन्ही आघाडय़ांवर निर्विवादपणे वर्चस्व गाजवणारे माजी सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. कारकीर्दीदरम्यान असंख्य शर्यती जिंकणाऱ्या झेंडे यांनी निवृत्तीनंतर युवा पिढीला या क्षेत्राकडे वळवण्यात मोलाची भूमिका बजावली. समाजमाध्यमांचे अस्तित्व नसतानाच्या काळात झेंडे यांनी सायकलिंग क्रीडा प्रकारासाठी केलेल्या कार्याचा आजही दाखला दिला जातो. ‘घाटांचा राजा’ असे बिरुद मिरवणाऱ्या झेंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांचे जवळचे मित्र आणि भारतीय सायकलिंग महासंघाचे कोषाध्यक्ष प्रताप जाधव यांनी घेतलेला हा वेध-

आधुनिक काळातही एखाद्याने सायकलपटू म्हणून कारकीर्द घडवण्याचा विचार केला, तरी अनेकांच्या भुवया उंचावतात; परंतु काही माणसांमध्ये ध्येयप्राप्तीसाठी सर्वस्व झोकून देण्याची क्षमता असते. माझे आदर्श आणि घनिष्ठ मित्र कमलाकर झेंडे हे त्यांपैकीच एक. जवळपास ४५ ते ५० वर्षांपूर्वी सायकलपटू म्हणून नावलौकिक मिळवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आणि त्यांच्या या निर्णयामुळे सायकलिंग क्रीडा क्षेत्राला एक प्रकारे देशभरात नवसंजीवनी मिळाली.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

भारतीय बनावटीच्या ‘रोड स्टार’ सायकलचा वापर करून १९७५ मध्ये मी पुणे जिल्हा पातळीवर सायकल शर्यतींमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. त्या वर्षी झेंडे यांनी दुसऱ्यांदा मुंबई-पुणे शर्यत जिंकली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. कात्रज घाटात सराव करताना एके दिवशी माझी त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली आणि तेथून मग मी सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून आव्हानात्मक परिस्थितीत सायकल चालवण्याचे विविध पैलू शिकून घेतले.

पुढे १९७७ पासून आम्ही दोघांनीही व्हील विनर्स सायकलिंग क्लबकडून एकत्र सरावाला प्रारंभ केला. १९८० मध्ये मी प्रथमच मुंबई-पुणे शर्यतीत सहभागी होणार होतो. या स्पर्धेसाठी घाटातून सायकल चालवताना शरीराचे संतुलन बाळगण्याबरोबरच सायकलवर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तुमची सायकलही त्या दर्जाची असणे आवश्यक आहे. त्या वेळी झेंडे यांनीच मला नवीन सायकल भेट दिली. मी या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला, तर झेंडे यांनी अपेक्षेप्रमाणे विजेतेपद मिळवले. पुढील दोन वर्षेही झेंडे यांनीच ही स्पर्धा जिंकून मुंबई-पुणे सायकल शर्यतीच्या अजिंक्यपदांची हॅट्ट्रिक साधली. त्यामुळे त्यांना ‘घाटाचा राजा’ असे नाव पडले. मात्र या नावामागील वेगळी कहाणी अनेकांना आजही माहीत नाही.

मुंबई-पुणे सायकल शर्यतीला खूप मानाचे स्थान आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणाऱ्याचे कौतुक होतेच; परंतु झेंडे यांनी १९८१ मध्ये बोरघाट शर्यत जिंकली. या घाटातून अनेकदा मोटार-सायकल किंवा चारचाकी गाडी घेऊन जाणारे चालकही शर्यत अर्धवट सोडायचे, तर काहींच्या गाडीचा अपघातही व्हायचा. अशा मार्गावरून झेंडे यांनी अनुभव आणि कौशल्याचा वापर करून सुरेख सायकल चालवली. त्यांच्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील सायकलपटूमध्ये अशक्यप्राय अंतर होते. त्यांची हा कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. पिंपरी-चिंचवड येथील नावाजलेले डॉ. अमरसिन्हा निकम यांना झेंडे यांच्या पराक्रमाविषयी समजले आणि त्यांनी झेंडे यांच्या कारकीर्दीवर आधारित पुस्तक लिहिण्याचे ठरवले. यासाठी डॉ. निकम यांनी झेंडे यांच्यासह अधिकाधिक वेळ घालवला. अनेकदा ते झेंडे यांच्या शर्यतीच्या ठिकाणीही हजेरी लावायचे. अखेर सहा महिन्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झेंडे यांच्या जीवनावरील ‘घाटांचा राजा’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

वयाच्या ३०व्या वर्षी झेंडे अखेरच्या सायकल शर्यतीत सहभागी झाले. घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी घेतलेली भरारी वाखाणण्याजोगी होती. आपण स्वत: कोणत्या अवस्थेतून कारकीर्द घडवली आहे, याची जाणीव असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाची मदत मागितली, तर ते साहाय्यासाठी तत्पर असायचे. निवृत्तीनंतर प्रशिक्षक आणि संघटक म्हणूनही त्यांनी सायकल क्षेत्रासाठी योगदान दिले. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध भूमिका बजावल्या.

गेल्या तीन-चार वर्षांपासून झेंडे अर्धागवायूने त्रस्त होते. त्यामुळे आयुष्यातील अखेरच्या क्षणी त्यांना नीट बोलताही येत नव्हते. मात्र त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भविष्यात सायकलिंग क्रीडा प्रकाराच्या उन्नतीसाठी अधिकाधिक जणांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. जीवनाच्या ६८ वर्षांपैकी किमान ४०-४५ वर्षे सायकलिंग क्षेत्रासाठी वाहणाऱ्या एका अवलियाला हीच खऱ्या अर्थाने आदरांजली असेल.

(शब्दांकन : ऋषिकेश बामणे)