धनंजय रिसोडकर

ग्राऊंड झिरो

नाशिकमधील तलवारबाजी

हिऱ्याला साजेसे कोंदण असले की त्याची लकाकी अजून वाढते. त्याप्रमाणेच कोणत्याही खेळासाठी सर्व प्रकारची पोषक परिस्थिती निर्माण केली की त्या खेळाचा आणि खेळाडूंचा लौकिकदेखील वाढतो, हे त्रिकालसत्य आहे. मात्र फारशी पोषक परिस्थिती नसताना आणि साधनसुविधांची मुबलकता नसतानाही जेव्हा एखादा खेळ एखाद्या भागात विशेष बहरू लागतो, तेव्हा त्यामागे एकतर खेळाडूंना निसर्गत: लाभलेले अंगभूत कौशल्य किंवा त्या भागातील क्रीडा प्रशिक्षक आणि संघटकांच्या कौशल्याचे फळ असते. नाशिकसारख्या तलवारबाजीची कोणतीच पाश्र्वभूमी नसलेल्या जिल्हय़ातून गेल्या दोन दशकांमध्ये तब्बल १० शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि प्रशिक्षक घडतात, तर त्यामागे निश्चितच स्थानिक स्तरावरील मार्गदर्शकांचे मोठे योगदान मानले जाते. सध्या या सर्व तलवारी म्यानाविनाच उसळत असल्या तरी त्यांना अधिक तीक्ष्णता लाभायची असेल तर भारतीय क्रीडा प्राधिकरणसारखे (साई) एखादे महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीचे केंद्र नाशिकला मिळाले तर येथील तलवारींच्या टोकांना थेट ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचीदेखील उंची लाभू शकते.

तलवारबाजी (फेन्सिंग) हा खेळ १८९६ सालच्या पहिल्या ऑलिम्पिकपासून आतापर्यंत सातत्याने खेळला जाणारा क्रीडाप्रकार आहे. मात्र प्रारंभी ब्रिटिश कालखंडात आणि त्यानंतर स्वतंत्र भारतातदेखील तलवारबाजीच्या खेळाकडे फारसे कुणाचेच लक्ष नव्हते. युद्धकौशल्यासाठी प्रख्यात असणाऱ्या देशातील लढवय्या प्रजातींमध्येदेखील या खेळाबाबत अनास्था होती. त्यामुळेच भारतात या खेळाची प्रभा दिसू लागण्यासाठी तब्बल १९७४पर्यंत थांबावे लागले. त्या वेळी एकूणच आशियाई देशांमध्येदेखील तलवारबाजीबाबत तशी अनास्था होती. त्यामुळेच इराणमधील तेहरान येथे १९७४ साली सर्वप्रथम आशियाई देशांसाठीचे एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी देशभरातून गेलेल्या चौघा तलवारबाजांमध्ये माधव कडव हे महाराष्ट्राचे पहिले तलवारबाज होते. त्यांनी तिथे आधुनिक तलवारबाजीचे प्रशिक्षण घेऊन मग भारतात या खेळाच्या प्रचार आणि प्रसाराला प्रारंभ केला.

या क्रीडा प्रकाराच्या ईपी, फॉइल आणि सॅबर या तीन विभिन्न प्रकारांत मिळून एकूण तब्बल ३६ पदके या खेळातून ऑलिम्पिकमध्ये आहेत. फार कमी खेळांना इतकी पदके आहेत, तरीदेखील या खेळाकडे दुर्लक्ष होण्याची कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. सगळी सोंगे आणता येतात, पण नाही. या खेळाला लागणारे साहित्य, उपकरणे आणि प्रशिक्षकांची अनुपलब्धता या सर्व बाबींमुळे हा खेळ भारतात आवश्यक त्या वेगाने बहरत नव्हता. अखेरीस या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘साई’ ने या खेळाला १९९४ साली विशेष खेळ म्हणून एक प्रकारे दत्तक घेतले. त्यामुळे मग विदेशातून तरबेज प्रशिक्षक आणि काही प्रमाणात अत्यावश्यक साहित्य, उपकरणे खेळाडूंना उपलब्ध होऊ लागली. त्यानंतर पुण्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीचा समावेश झाल्यामुळे संपूर्ण भारतात खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्यास काहीशी मदत झाली. त्याच काळात नाशिकमध्ये अशोक दुधारे, राजू शिंदे आणि निर्मला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजीचा खेळ बहरण्यास प्रारंभ झाला. या प्रशिक्षकांनी विविध माध्यमातून क्रीडा साहित्य आणि उपकरणांची जुळवाजुळव करीत या खेळाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्रारंभ केला.

गेल्या दीड दशकामध्ये नाशिकला विविध वयोगटांतील सुमारे ४० राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. मात्र, या खेळातील तलवार, जाळीचा मुखवटा, जॅकेट, हातमोजे, बूट, स्टॉकिंग्ज, बॉडीवायर या सर्व बाबींचा किमान खर्चच २० ते २५ हजारांच्या घरात जाणारा असतो. त्यामुळे या खर्चीक खेळाकडे सामान्य घरातील मुलांना पोहोचणे अशक्य कोटीतील काम असते. अशा वेळी औरंगाबादला ज्याप्रमाणे ‘साई’चे केंद्र सुरू झाल्याने तिथ या खेळाच्या प्रसाराला बळ मिळाले, त्याप्रमाणेच नाशिकला ‘क्रीडा प्रबोधिनी’चे केंद्र सुरू झाल्यास सामान्यघरांमधील सक्षम खेळाडूंमधील प्रतिभेला न्याय मिळणे शक्य होणार आहे.

बालवयातील तलवारबाज

कोणत्याही खेळात बालवयातच मुला-मुलींमधील सुप्त गुण ओळखून त्यांचा उपयोग केल्यास त्या खेळात अधिक चांगले यश लाभू शकते, हा वैश्विक अनुभव आहे. त्यानुसारच तलवारबाजीतदेखील १० वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील गटांच्या स्पर्धा भरवण्याची कल्पकता नाशिकच्या क्रीडा संघटकांनी दाखवली. त्यामुळे त्या वयापासूनच खेळाडू पुढे येण्यास आणि खेळाचा प्रसार होण्यास निश्चितच मदत होत आहे.

महाराष्ट्रातील तलवारबाजीच्या विकासासाठी राज्य शासनाने या क्रीडा प्रकाराची स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी सुरू करणे अत्यावश्यक आहे. तसे झाल्यास राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो.

– अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक आणि संघटक

औरंगाबादच्या ‘साई’ केंद्राप्रमाणे राज्य शासनाने नाशिकला क्रीडा प्रबोधिनीचे केंद्र सुरू केल्यास उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावंत खेळाडूंना मार्गदर्शन मिळण्यासह खेळाचाही प्रसार होणे शक्य आहे.

– राजू शिंदे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक