प्रशांत केणी

गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट संघर्ष हा चाहत्यांसाठी पर्वणी ठरत आला आहे. किं बहुना अ‍ॅशेस किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील रणधुमाळीपेक्षा अधिक रोमहर्षकता भारत-ऑस्ट्रेलिया लढतींमध्ये दिसून येते. करोना साथीच्या कठीण कालखंडात आर्थिक तोटा टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेसाठी राजी केले आहे. प्रेक्षकांच्या साक्षीने होणारी ही मालिका रंगतदार होईल, पण ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी क्रिके टपटूंनी कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित तीन कसोटी सामन्यांत तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असा सावधतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिके ची उत्कं ठा शिगेला पोहोचली आहे.

१९९९च्या अ‍ॅडलेड कसोटीत ग्लेन मॅकग्राचा उसळणारा चेंडू चुकवण्यासाठी खाली झुकलेल्या सचिनच्या खांद्यावर आदळला होता, परंतु पंच डॅरेल हार्पर यांनी सचिन पायचीत असल्याचा कौल दिला. या वादामुळे २००२ पासून कसोटी मालिकेकरिता त्रयस्थ पंचांची संकल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अमलात आणली. २००७-०८ मधील हरभजन सिंग-अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्या वादावर आधारित ‘मंकी गेट’ प्रकरण आख्यायिका झाले. गांगुलीने २००१ मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला नाणेफेकीसाठी ताटकळत ठेवले होते. ब्लेझर सापडत नव्हता म्हणून विलंब झाल्याचे गांगुलीने नंतर म्हटले, परंतु स्टीव्हनेही आपल्या ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ या आत्मचरित्रात त्या घटनेचा उल्लेख केला आहे. २०१७च्या बेंगळूरु कसोटीत स्टीव्ह स्मिथने पंचांनी बाद दिल्यानंतर पंचांकडून फेरआढावा म्हणेच ‘डीआरएस’ घेण्यासंदर्भात ड्रेसिंग रूममध्ये विचारणा केली होती. कोहलीने ही बाब त्वरित पंचांच्या निदर्शनास आणली. असे अनेक कटू प्रसंग या दोन संघांच्या मालिकांमध्ये घडले आहेत.

वस्तुस्थिती

भारत : पितृत्वाच्या रजेसाठी तीन सामन्यांमध्ये कोहली अनुपलब्ध असल्याचा फटका भारताला बसू शकतो. रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी उपलब्ध होणार असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये तो आपले नाणे खणखणीत असल्याचे कधीच सिद्ध करू शकलेला नाही, हे वास्तव आहे.

मागील यशात चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण कामगिरी आणि भारताचा वेगवान मारा हे घटक महत्त्वाचे ठरले होते. आगामी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारताच्या फलंदाजीची मदार पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कोहलीवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवेल. त्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची भिस्त जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर आहे.

ऑस्ट्रेलिया : साम-दाम-दंड-भेद रणनीतीचा वापर करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नीतिमत्तेला चेंडू फेरफार प्रकरणाचा फटका बसला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवरील बंदीमुळे भारताला मागील मालिकेत इतिहास घडवता आला, पण त्याची पुनरावृत्ती करणे अवघड आहे. वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध आहे. त्यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या जो बर्न्‍ससह सलामीची चिंता ऑस्ट्रेलियाला सतावते आहे, पण आता ऑस्ट्रेलियाकडे चिवट फलंदाजी करणारा मार्नस लबूशेन हा तारणहार आहे. फक्त १४ कसोटी सामन्यांत त्याने ६३.४३च्या सरासरीने १४५९ धावा केल्या आहेत. मागील भारताविरुद्धच्या मालिकेत एकमेव सामना खेळणाऱ्या लबूशेनने अ‍ॅशेस आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पॅट कमिन्स आणि नॅथन लिऑन घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत.

आकडेवारी

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील आतापर्यंतच्या १२ मालिकांपैकी ८ ऑस्ट्रेलियाने तर २०१८ची एकमेव मालिका भारताने जिंकली आहे, तर तीन मालिका बरोबरीत सोडवल्या आहेत. कसोटी सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास ४८ पैकी २९ सामने ऑस्ट्रेलियाने आणि ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर १२ सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. ही सांख्यिकी भारतासाठी मुळीच अनुकूल नाही, पण ऑस्ट्रेलियातील मागील दोन मालिकांचे निकाल भारतासाठी अनुकूल ठरतात. २०१४ मध्ये भारताने चार कसोटी सामन्यांपैकी दोन अनिर्णित राखले होते, तर मागील मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. वर्षांच्या पूर्वार्धात भारतीय संघाने न्यूझीलंड भूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका ०-२ अशी गमावली होती, तर ऑस्ट्रेलियाने जानेवारीत आपल्या याआधीच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्धच ३-० असे निभ्रेळ यश मिळवले आहे. हे सारेच आकडे ऑस्ट्रेलियासाठी अनुकूलता दर्शवतात.

भारतीय संघ अ‍ॅडलेडला प्रकाशझोतात गुलाबी चेंडूनिशी पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत सहापैकी सहा प्रकाशझोतातील सामने जिंकण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या गाठीशी आहे, तर भारतीय संघ एकमेव कसोटी सामना खेळला आहे. गतवर्षी ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध भारताने डावाने विजय मिळवला होता. याच अ‍ॅडलेडवर २००३ मध्ये द्रविड-लक्ष्मणने ३०३ धावांची भागीदारी रचून भारताला आश्चर्यकारक विजय मिळवून दिला होता. त्या वेळी द्रविडने २३३ धावा केल्या, तर लक्ष्मणने १४८ धावा केल्या होत्या.

prashant.keni@expressinda.com