धनंजय रिसोडकर

‘मनोरा’ अकादमी मुंबई</strong>

नुसती पुस्तके वाचून आणि घोकून कोणताच विद्यार्थी अव्वल येऊ शकत नाही. त्यासाठी त्याला सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून त्यातून सराव करावा लागतो. या सराव परीक्षांमधूनच आपली तयारी नक्की किती आहे, त्याचा अदमास विद्यार्थ्यांना येतो. त्याप्रमाणेच खेळातदेखील केवळ सराव करून तितकीशी प्रगती साधता येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होऊन तिथे प्रतिस्पध्र्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यात काही उणीव राहिल्यास त्यातून नवनवीन मार्ग शोधत पुढील वाटचाल करावी लागते. त्यानंतरच प्रत्येक खेळाडूच्या खेळात वेगाने सुधारणा घडू लागते. उमलत्या वयातील बॅडमिंटनपटूंच्या सरावाला स्पर्धामध्ये नियमितपणे खेळण्याच्या संधीची जोड दिल्यास त्यांच्या खेळात आमूलाग्र बदल होऊ शकतो, ही बाब मनोहर गोडसे यांनी अचूक हेरली. १९९७ सालापासून ‘मनोरा’ अकादमीच्या माध्यमातून मुंबई आणि ठाणे परिसरातील बहुतांश जिमखान्यांमध्ये सातत्याने दर्जेदार स्पर्धाचे आयोजन केले. त्यातून हजारो बॅडमिंटनपटूंना स्पर्धेच्या सातत्यपूर्ण संधी देण्याचे कार्य त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवले. अशा स्पर्धा आयोजनाचे शतक साजरे केल्यानंतर या ७८ वर्षांच्या तरुणाची स्पर्धाची वाटचाल पुढच्या शतकाच्या दिशेने सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचे जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचा खेळ बघूनच गोडसे यांचा बॅडमिंटनपटू बनण्याच्या प्रवासाला वयाच्या पंचविशीत सुरू झाला. त्यानंतर त्यांना केवळ सरावापेक्षा स्पर्धामध्ये खेळण्याचे फायदे उमगत गेले. काही काळानंतर त्याच नाटेकर यांच्या बरोबरीने ते दुहेरी स्पर्धामध्ये खेळले. चार राष्ट्रीय स्पर्धाची विजेतेपद पटकावतानाच गोडसेंनी वरिष्ठांच्या दुहेरीत थेट ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन’ स्पर्धेपर्यंत मजल मारली. दरम्यान आपल्याला उमगलेले स्पर्धाचे महत्त्व उमलत्या वयातील खेळाडूंना लवकर समजावे आणि त्यांना भरपूर संधी मिळाल्या तरच त्यांचा खेळ वेगाने विकसित होईल, असा विचार त्यांच्या मनात आला. १९९०च्या दशकात बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन अभावानेच व्हायचे. त्यामुळेच १० ते १७ वयोगटातील खेळाडूंसाठी नियमित स्पर्धा घेण्याच्या इराद्यानेच गोडसे यांनी वयाच्या साठीत ‘मनोरा अकादमी’ची स्थापना केली. ही अकादमी खेळाडूंचा स्पर्धासराव या एकाच उद्देशाने निर्माण करण्यात आली. त्यामुळे सदस्य शुल्क आणि स्पर्धा शुल्क अगदी नाममात्र ठेवून स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा मानस होता.

अकादमी कागदोपत्री तर स्थापन झाली, पण जागा नसल्याने स्पर्धा कशा घेणार हा यक्षप्रश्न होताच. मात्र गोडसे हे नामांकित खेळाडू व प्रशिक्षक असल्याने तसेच त्यांच्या पारदर्शी स्वभावाची आणि केवळ खेळाडूंचा फायदा या सूत्राची कल्पना असल्याने अनेक जिमखान्यांच्या संचालक मंडळांनी त्यांना कोणतेही शुल्क न आकारता त्यांच्या जिमखान्यांमधील बॅडमिंटन कोर्ट दोन दिवस स्पर्धा आयोजनासाठी मोफत देण्याची तयारी दर्शवली. १९९६मध्ये स्थापन झालेल्या ‘मनोरा’च्या माध्यमातून प्रत्यक्ष स्पर्धा आयोजनाला १९९७ पासून प्रारंभ झाला. दरवर्षी किमान चार-पाच  स्पर्धाचे आयोजन हे त्यांच्या अकादमीचे सूत्र आहे.

तेदेखील खेळाडूंच्या राज्य, राष्ट्रीय, अन्य महत्त्वाच्या स्पर्धा किंवा शालेय परीक्षांचे वेळापत्रक या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार करून स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यामुळेच गेल्या २२ वर्षांत या अकादमीने १०० स्पर्धाच्या आयोजनाचे दिव्य पार केले आहे.

वर्षभरात एका स्पर्धेचे आयोजन करायचे असले तरी मोठमोठय़ा संस्थांची आणि आयोजकांची तारांबळ उडते. तिथे दरवर्षी स्पर्धाचे हे अग्निहोत्र सुरू ठेवायचे अत्यंत बिकट कार्य गोडसे या व्यक्तीरूपी संस्थेने अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. त्यामुळेच भारताचे माजी अव्वल बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनीदेखील गोडसे यांची भेट घेऊन त्यांच्या स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले.

स्पर्धामधून नावारूपाला आलेले खेळाडू

राष्ट्रीय स्तरावर झळकणारा अजय जयराम, अक्षय देवळकर, अदिती मुटाटकर, श्लोक रामचंद्रन, तन्वी लाड, सायली राणे, प्राजक्ता सावंत, हर्ष झव्हेरी, हर्षांली दाणी, सिमरन सिंघी, रिशा दुबे यांच्यासारखे अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकलेले खेळाडू हे त्यांच्या बालपणी आणि उमलत्या वयात मनोरा अकादमीच्या स्पर्धातून सातत्याने खेळले. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकणारे शेकडो उदयोन्मुख खेळाडू हे आजही ‘मनोरा’ अकादमीच्या स्पर्धामध्ये भाग घेऊन नावारूपाला येत आहेत.