News Flash

विद्यार्थी-पालकांना क्रीडापटू घडवण्याचा ध्यास!

केवळ खेळाडू नव्हे, तर पालकांनाही प्रशिक्षक व पंच म्हणून घडवण्यासाठी येथे प्रोत्साहन मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ग्राऊंड झिरो : पुणे रनिंग संस्था

शालेय स्तरावरच खऱ्या अर्थाने क्रीडा नैपुण्य उपलब्ध असते. फक्त या नैपुण्याचा शोध घेण्याची व त्यानंतर त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सिम्बायोसिस क्रीडा संस्थेमार्फत गेली २५ वर्षे बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, तायक्वांदो, रोलर स्केटिंग, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आदी अनेक क्रीडा प्रकारांच्या विकासाचे कार्य केले जात आहे. हे कार्य करताना मुलखावेगळ्या उपक्रमांचे आयोजन करीत मुलामुलींमध्ये खेळाची कशी आवड निर्माण होईल व त्याचा उपयोग त्यांना कारकीर्द घडवण्यासाठी कसा होईल, यावर भर देण्यात आला आहे. केवळ खेळाडू नव्हे, तर पालकांनाही प्रशिक्षक व पंच म्हणून घडवण्यासाठी येथे प्रोत्साहन मिळत आहे.

सिम्बायोसिस ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम शैक्षणिक संस्था आहे. त्याचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार हे स्वत: क्रीडाप्रेमी असल्यामुळे महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याचे त्यांचे ध्येय होते. पुणे विद्यापीठात एका विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले त्यांचे विद्यार्थी डॉ. सतीश ठिगळे यांना हाताशी धरून त्यांनी १९९३ मध्ये सिम्बायोसिस क्रीडा केंद्राची स्थापना सुरू केली. हे केंद्र जरी सिम्बायोसिस प्रशालेतील एका प्रशस्त संकुलात सुरू असले तरी सिम्बायोसिस प्रशालेबरोबरच राज्यातील सर्वासाठी हे केंद्र खुले ठेवण्यात आल्यामुळे त्याचा लाभ आजपर्यंत शेकडो खेळाडूंनी घेतला आहे. दिव्या देशपांडे, हर्षित राजा, सिद्धांत गायकवाड, शशांक पटवर्धन, अथर्व वैरागडे आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक खेळाडूंनी तेथून खेळाचे बाळकडू घेत आपली कारकीर्द घडवली आहे. अरविंद नातू, सुरेंद्र देशपांडे, मधुकर लोणारे, नीरज होनप (टेबल टेनिस), मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, कपिल लोहाना, श्रुती पटवर्धन (बुद्धिबळ), एस. पी. ढवळे, संपदा सहस्रबुद्धे (बॅडमिंटन), हर्षल मुंडफन (स्केटिंग) आदी अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन येथील खेळाडूंना मिळत आहे.

खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकांनाही अधूनमधून अद्ययावत तंत्रज्ञान घेण्याची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊनच या संस्थेत विविध खेळांच्या प्रशिक्षकांकरिता राज्यस्तरावर उद्बोधक शिबिरे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा फायदा राज्यातील अनेक प्रशिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक होण्यासाठी झाला आहे. देशात बुद्धिबळाचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा या संस्थेने सुरू केली. सहभागी होणाऱ्यांना खेळाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रीतसर पदविकाही दिली जाते. त्याचा लाभ घेत अनेकांनी आता प्रशिक्षक व पंच म्हणून आपले करिअर विकसित केले आहे. डॉ. मुजुमदार व डॉ. ठिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेद्वारे अनेक नैपुण्यवान खेळाडूंना करिअरसाठी योग्य दिशा मिळत आहे.

सिम्बॉयसिस क्रीडाभूषणचे मानकरी

क्रीडा क्षेत्रात कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता व अन्य कोणताही महत्त्वाचा सन्मान किंवा पुरस्कार न मिळालेल्या क्रीडा संघटक, प्रशिक्षक व समीक्षकांना २००१ पासून सिम्बायोसिस क्रीडाभूषण पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. त्यामध्ये हेमंत जोगदेव, रमेश देसाई, अर्नवाझ दमानिया, कर्नल डॉ. एस. ए. क्रूझ, प्रकाश तुळपुळे, एस. आर. मोहिते, अण्णा नातू, नंदन बाळ, कै. हरिश्चंद्र बिराजदार, देविदास जाधव, अनिरुद्ध देशपांडे, प्रकाश कुंटे, दीपाली देशपांडे, विशाल चोरडिया, विश्वजित कदम, राजू दाभाडे, ज्येष्ठ अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंदर सिंग आदींचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी कोणताही अर्ज किंवा कोणाची शिफारस न घेता निवड केली जात असते.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंची भेट

या संस्थेला आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भेट देऊन येथील उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये माजी क्रिकेट कर्णधार कपिलदेव, सौरव गांगुली, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता टेनिसपटू लिएण्डर पेस, विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद, ऑलिम्पिक हॉकीपटू धनराज पिल्ले आदींचा समावेश आहे. त्यांच्याबरोबरच ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर, सनदी अधिकारी किरण बेदी, डॉ. नितीन करीर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदी नामवंत व्यक्तींनी येथील मुलामुलींना व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या सर्वाबरोबर संवाद साधण्याची संधीही मुलामुलींना देण्यात आली आहे.

अनेक उपक्रमांचे जनक

सिक्स अ साइड क्रिकेट स्पर्धा, बुद्धिबळाचा शालेय अभ्यासक्रम, खेळाडूंबरोबर येणाऱ्या पालकांना पंच म्हणून घडवण्यासाठी बुद्धिबळ व टेबल टेनिसमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम, महिला बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र विरुद्ध शेष भारत असा ग्रॅण्डमास्टर्स खेळाडूंचा सामना, टेबल टेनिस स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धाप्रमाणे दोन टेबलांमध्ये ‘बॅरिगेटर्स’, टेबल टेनिस व बुद्धिबळ या खेळांकरिता शालेय स्तरावर शिष्यवृत्ती देणारी लीग स्पर्धा, बुद्धिबळाचे मिश्र दुहेरीची स्पर्धा आदी अनेक उपक्रम या संस्थेने सुरू केले व त्यानंतर अनेक संस्थांनी त्यांचे अनुकरण केले आहे. एक वेळ रणजी सामन्यांना प्रेक्षकवर्ग नसेल, पण सिक्स-अ-साइड स्पर्धेस एक हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती असायची व त्यामध्ये पुण्या-मुंबईतील अनेक आजी-माजी रणजीपटूंनी भाग घेतला होता.

बुद्धिबळ स्पर्धामध्ये सौम्या स्वामिनाथन, ईशा करवडे, स्वाती घाटे, कृत्तिका नाडिग, पद्मिनी राऊत, मेरी अ‍ॅन गोम्स, निशा मोहोता, किरण मनीषा मोहंती आदी अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी भाग घेतला आहे. शालेय लीगच्या वेळी पुण्यातील नामवंत खेळाडूंद्वारे गुणवान खेळाडूंचे पाच संघ तयार करण्यात येतात. या संघांकरिता ख्यातनाम खेळाडूंची प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी निवड करण्यात येते. स्पर्धेपूर्वी या प्रशिक्षकांद्वारे खेळाडूंकरिता प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले जाते. त्यामुळे स्पर्धाही अतिशय रंगतदार होत असते. क्रिकेटमध्येही ‘मॅक्सझोन’ ही मुलखावेगळी स्पर्धा घेण्यात आली होती. आखलेल्या ठरावीक भागात चेंडूचा पहिला टप्पा पडला की आठ धावा, तर काही ठिकाणी सहा धावा अशा स्वरूपाची ही स्पर्धा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:12 am

Web Title: article about pune running sports foundation
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व सरिता देवीचे पदक निश्चित
2 रशियाचा अलेक्झांडर उत्तेजकप्रकरणी दोषी
3 आपल्याकडील ‘नॅसर’ना कधी शिक्षा होणार?
Just Now!
X