धनंजय रिसोडकर, मुंबई

ज्या खेळाच्या शालेय, महाविद्यालयीन स्पर्धाना महाराष्ट्रात प्रारंभ झाला, तोच महाराष्ट्र नेमबाजीतील वर्चस्व गमावत चालला आहे. त्याच्या प्रमुख कारणांमध्ये महाविद्यालयीन स्तरावर नेमबाजी प्रशिक्षणातील होत असलेली पीछेहाट गणली जात आहे. गेल्या दीड दशकात शाळा आणि महाविद्यालयांत नेमबाजीच्या रेंजची संख्या पुरेशा प्रमाणात वाढली नाही; किंबहुना काही शाळा आणि महाविद्यालयांत तर आधीच्या रेंज बंद करण्यात आल्या आहेत. उत्तरेकडील राज्यांतील शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात नेमबाजीच्या उभारणीवर भर दिला जात असताना आपल्याकडे त्याच्या उलट परिस्थिती आहे. महाराष्ट्रात तर शालेय, महाविद्यालयीन रेंजचे प्रमाण नगण्यच होते; पण मुंबईच्या महाविद्यालयातही रेंज बंद पडण्याचे किंवा फारसे प्रभावीपणे वापरले जात नसल्याची उदाहरणे आहेत. काही प्रख्यात महाविद्यालयांमध्ये तर विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत रेंजची जागा अधिक पैसा मिळवून देणाऱ्या अन्य शैक्षणिक कारणांसाठी वापरल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारांना आळा घातला न गेल्यास शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावरील नेमबाजी अजून संकटात येऊ शकते.

महाविद्यालयांमध्ये नेमबाजीसाठी स्वतंत्र रेंज निर्माण करून नेमबाज घडवण्याचे धोरण नव्वदच्या दशकात मुंबईत मूळ धरू लागले. मात्र पुरेशा प्रमाणात विद्यार्थी न मिळणे आणि सातत्याच्या अभावामुळे त्यातील काही महाविद्यालयांनी त्यांच्या या रेंज बंद केल्या आहेत. त्यात कीर्ती, चेतना यांसारख्या महाविद्यालयांचा समावेश आहे. ज्या मोजक्या महाविद्यालयांमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण दिले जात आहे, त्या महाविद्यालयांमध्येदेखील खेळाडूंचा अभाव दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत युवा खेळाडूंची खाण पुढे येत असताना मुंबईसह महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये मात्र नेमबाजीबाबतची उदासीनता वाढत असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्येदेखील नेमबाजीचा खेळ पुन्हा बहरण्यासाठी काही तातडीचे बदल अत्यावश्यक असून ते झाले तरच या खेळात पुन्हा महाराष्ट्राचे नाव आघाडीवर येऊ शकेल.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्षितिजावर अंजली भागवत, सुमा शिरूर तळपू लागल्याच्या सुमारासच मुंबईतील महाविद्यालयांमध्ये नेमबाजीच्या रेंज उभारणीस गती आली. या महाराष्ट्रकन्यांप्रमाणेच आपल्या महाविद्यालयांतूनही नवनवीन मुलेमुली पुढे येतील आणि महाविद्यालयांचे नाव पुढे नेतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे कमी जागा उपलब्ध असतानाही मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालय, गुरुनानक खालसा महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय, तोलानी महाविद्यालय, विवा महाविद्यालय, पाटकर महाविद्यालय, पेंढारकर महाविद्यालय, बिर्ला महाविद्यालय यांनी त्यांच्या महाविद्यालयांच्या उपलब्ध जागेत १० मीटरच्या शूटिंग रेंज उभारल्या होत्या. प्रारंभीच्या दशकभरात या रेंजकडे विद्यार्थ्यांचा चांगला ओढा होता. मात्र गेल्या काही वर्षांत एकुणातच नेमबाजीकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे.

मुंबईतील महाविद्यालयांपैकी केवळ रुईया महाविद्यालयात दोन अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक लक्ष्य आहेत. या महाविद्यालयात ७० नेमबाज नियमितपणे सराव करतात. त्यातदेखील महाविद्यालयाबरोबरच आसपासच्या शाळांतील नेमबाजांचादेखील समावेश आहे. नेमबाज आयोनिका पॉलने तिच्या कारकीर्दीचा प्रारंभ या महाविद्यालयाच्या रेंजवरच केला होता. त्या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे १६ आंतरराष्ट्रीय नेमबाज घडवले आहेत. त्यातील नेहा साप्ते आणि अशोक कारंडे यांनी शिवछत्रपती पुरस्कारदेखील पटकावला आहे. मात्र या महाविद्यालयासदेखील पुरेशा प्रमाणात नेमबाज विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे.

खालसा महाविद्यालयात रेंजच्या पुनर्निर्माणात तीन वर्षांचा काळ गेल्यानंतर गतवर्षीपासून महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक आणि वातानुकूलित रेंज तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या रेंजवर पुन्हा नेमबाजांचा नियमित सराव सुरू झाला असून महाविद्यालयातील नेमबाजांनी यंदाच्या स्पर्धामध्ये चमकदेखील दाखवली. मात्र एकूण नेमबाजांची संख्या २० असून त्यातही काही खेळाडू महाविद्यालयाबाहेरील आहेत. भक्ती खामकर ही या महाविद्यालयाची नेमबाज सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत आहे, तर राष्ट्रीय स्तरावरील ४ आणि राज्य स्तरावरील ७ नेमबाज या महाविद्यालयात सराव करीत आहेत. अन्य महाविद्यालयांमध्येदेखील कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. नेमबाजीत पुन्हा दीड दशकापूर्वीचे वर्चस्व मिळवायचे असेल तर पुन्हा या रेंजवर चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक नेमून त्याकडे विद्यार्थी खेचून आणावे लागतील. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणारे सौरभ चौधरी, मनू भाकर यांसारखे उत्तरेकडील राज्यांतील अनेक खेळाडू हे शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धामधूनच पुढे येऊ लागले आहेत. ‘नॅक’च्या गुणांकनात रेंजला स्वतंत्र गुण असल्याने त्याचा लाभ केवळ दिखाव्यापुरता करण्यापेक्षा तिथे राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नेमून नेमबाजीतील प्रतिभावंतांना पुढे आणण्याची गरज आहे.

आंतरशालेय स्पर्धेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला. आता २७ राज्ये त्यात मोठय़ा हिरिरीने सहभागी होतात. उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, बिहार या राज्यांनी त्यात चांगली प्रगती साधली असताना महाराष्ट्र पिछाडीवर पडत चालला आहे.

– विश्वजित शिंदे, राष्ट्रीय प्रशिक्षक