ऋषिकेश बामणे

जवळपास दीड वर्षांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला म्हणावी तितकी लोकप्रियता कधीच मिळाली नव्हती. मिताली राज आणि झुलन गोस्वामी असे मोजके चेहरे सोडले तर भारतीय संघातील क्रिकेटपटूंना फार कुणी ओळखतही नव्हते. पण २०१७च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत मजल मारली आणि मग विश्वविजेतेपद निसटले. अखेरच्या क्षणी भारताने हाराकिरी पत्करली असली तरी भारताच्या झुंजार वृत्तीची प्रशंसा झाली. त्यानंतर स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्स यांच्यासारखे तारे भारताला गवसले आणि जगाच्या कोणत्याही संघाला नमवण्याची ताकद असलेला संघ अशी ख्याती भारताची झाली आहे. भारतीय महिला संघाच्या स्थित्यंतराची गाथाही प्रेरणादायी आहे.

गेल्या वर्षी रमेश पोवार प्रशिक्षक असताना भारतीय महिला संघात वाद निर्माण झाला. संघात एकाधिकारशाही गाजवण्यासाठीचे हरमनप्रीत कौर आणि मिताली राज या कर्णधारांचे मनसुबे जगजाहीर झाल्यानंतर त्याचा फटका भारताच्या कामगिरीलाही बसला. पण त्यानंतर नवे प्रशिक्षक आणि नवी उमेद घेऊन स्थित्यंतराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय महिला संघाने अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यात यश मिळवल्यानंतर घरच्या मैदानावर विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत करण्याची किमया साधली आहे. एकूणच महिला क्रिकेटचे बदललेले स्वरूप चाहत्यांनाही आवडत असून काही काळासाठी क्रिकेटमधील राजकारणामुळे मागे वळलेली पावले आता पुन्हा एकदा स्टेडियमच्या दिशेने वळू लागली आहेत.

महाराष्ट्राची आघाडी

भारताच्या गेल्या काही वर्षांतील उल्लेखनीय यशात सर्वाधिक योगदान सलामीवीरांचे आहे. स्मृती मानधना ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा मानली जात आहे. जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती यांनी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर एक शतकी व दोन अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. त्याशिवाय या दोघींपैकी एकीने मोठी खेळी साकारल्यास भारत नेहमीच सुस्थितीत असतो. गेल्या दोन मालिकांमध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या स्मृतीची देशात विराट कोहलीप्रमाणेच लोकप्रियता आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेद्वारे पुनरागमन करणाऱ्या पूनम राऊतने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत एका अर्धशतकासह पूनमने तिसऱ्या क्रमांकावर दावेदारी सिद्ध केली असून तिच्यामुळे मिताली व हरमनप्रीत यांच्यावरील भार कमी झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला संघाच्या पहिल्या तिन्ही फलंदाज या महाराष्ट्राच्या खेळाडू आहेत.

झुलन-शिखाचा भेदक मारा

गेली तब्बल १७ वर्षे भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळणारी झुलन गोस्वामी कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असतानाही संघाच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम यापूर्वीच आपल्या नावावर केलेल्या झुलनने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तीन सामन्यांत नऊ बळी पटकावले. तिच्या मार्गदर्शनाखाली शिखा पांडेनेही कामगिरीत कमालीची सुधारणा केली असून, गोलंदाजीसह फलंदाजीतही ती बहुमूल्य योगदान देऊ शकते, हे अधोरेखित झाले. या दोघींनंतर मानसी जोशी, अरुंधती रेड्डी यांसारख्या युवा खेळाडूही उज्ज्वल कामगिरीसाठी पुढे सरसावत आहेत.

फिरकी त्रिकुटाची छाप

पूनम यादव, एकता बिश्त व दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुख्य म्हणजे मागील पाच लढतीत तिघींनी मिळून तब्बल २३ बळी मिळवले असून दीप्तीने मोक्याच्या क्षणी संघासाठी फलंदाजीतही भरीव योगदान दिले आहे. लेग-स्पिनर पूनम, ऑफ-स्पिनर दीप्ती व डावखुरी फिरकी गोलंदाज एकता या घरच्या तसेच परदेशातील खेळपट्टय़ांवरदेखील यशस्वी होत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेसाठी भारताची निदान फिरकीची चिंता मिटली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

प्रभावी रामन

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस रमेश पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. पोवार-मिताली-हरमनप्रीत यांच्यात रंगलेल्या मानापमान नाटय़ामुळे पोवार यांची पुन्हा प्रशिक्षकपदी निवड होण्याची सुतराम शक्यता नव्हती. अशा वेळी डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडे महिला संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. शांत पण शिस्तप्रिय स्वभावाच्या रामन यांनी संघातील खेळाडूंना एकत्रित आणून अनुभवी खेळाडूंमधील मतभेद दूर करण्यात मोलाची भूमिका बजावली. रामन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवल्यानंतर संघात सकारात्मकतेचे वारे वाहत आहेत, अशी प्रतिक्रिया खेळाडू व्यक्त करत आहेत. रामन हे कमी कालावधीतच प्रभावी ठरल्याने भविष्यात महिला संघाच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहील, अशी आशा आहे.