संतोष सावंत

ते दोघे जण जीव घेऊन पळत होते. लोकांच्या आरडय़ाओरडय़ाचा आवाज अगदी पाठीशी येऊन भिडल्यासारखा वाटत होता. त्यातील एक साडेपाच फूट उंचीचा, तर दुसरा जवळपास सहा फूट उंचीचा होता. एका जगज्जेत्या राष्ट्राचे ते नावाजलेले सेनाधिकारी होते. त्यांची शरीरे कमावलेली होती. अनेक युद्धे त्यांनी आपल्या पराक्रमाने गाजवली होती, जिंकून दिली होती. त्यांचे चाहते त्यांच्याच देशात नव्हे तर इतर देशांतही होते. अशा महाप्रतापी वीरांवर ही दुर्दैवी वेळ आली होती, ती एका अक्षम्य चुकीमुळे. गेले वर्षभर हा अज्ञातवास त्यांच्या नशिबी आला होता.

ज्यांनी आजवर त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले, तेच आज त्यांच्यावर जिव्हारी लागतील अशा वाक्बाणांचे शरसंधान करत होते. आजची रात्र ही त्यांची अज्ञातवासातील शेवटची रात्र होती. उद्या त्यांच्या शिक्षेची समाप्ती होणार होती. मायदेशात परतण्यापूर्वी काही दिवस भारतात आसरा घ्यायचा असे त्यांनी निश्चित केले होते. त्यांच्या महागुरूंनीही यास संमती दिली होती. एक वर्षांच्या काळात युद्धाभ्यासात पडलेला खंड भरून काढण्याची संधी येथेच लाभेल असे सूतोवाच त्यांनी केले होते. का कोण जाणे भारतीय महावृक्षाच्या सावलीत आपल्याला शांती लाभेल, अशी खात्री त्यांनाही वाटू लागली होती. दोघांचाही छातीचा भाता एकसारखाच वेगाने हलत होता. सोनेरी केस घामाने भिजले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांना एक वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग जसाचा तसा आठवला.

वर्ष होते २०१८. मार्च महिना. दक्षिण आफ्रिकेसोबत तिसरे युद्ध रंगात आले होते. काय दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी युद्धाच्या नियमांचा भंग केला. युद्ध लवकर जिंकण्यासाठी त्यांनी स्फोटकाच्या गोळ्यासोबत अवैध पद्धतीने छेडछाड केली. ज्यांनी आदर्श समोर ठेवायचा त्यांनीच अयोग्य वर्तन केले. आकाशपक्ष्याच्या तीक्ष्ण दृष्टीतून हा प्रकार सुटला नाही. त्यामुळे चौकशी झाली. सवालजबाब झाले आणि दोषी ठरवून एक वर्षांच्या अज्ञातवासाची शिक्षा दोघांनाही सुनावण्यात आली. त्यांना आपली अधिकारपदाची वस्त्रे उतरवावी लागली. अज्ञातवासाच्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय युद्धकार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. त्या दिवसापासून आजतागायत ते असेच देशोदेशी फिरत राहिले होते. सर्वत्रच त्यांना बोचरी टीका सहन करावी लागली होती. पश्चात्तापाच्या आगीत होरपळत राहण्याशिवाय आता त्यांच्या हातात दुसरे काहीच उरले नव्हते.

लोकांचा गलका कानावर पडू लागला आणि ते भानावर आले. वर्षभर एकत्र राहिल्याने आता त्यांना शब्दावाचून संवाद साधणे जमू लागले होते. त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि ते पळण्यासाठी सज्ज झाले. अचानक लोकांचे आवाज दूरदूर जाऊ  लागले आणि त्यांना हायसे वाटले. आता हा लपाछपीचा खेळ त्यांनाही नकोसा वाटू लागला होता. उद्या शिक्षा संपली तरी आरोप कायमच राहणार होते. लोकांनी ते विसरावे असे वाटत असेल तर आपल्याला खूप मोठे पराक्रम गाजवावे लागणार याची त्यांना कल्पना होती. जिवाचे रान करून त्यांना पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार होती आणि महत्त्वाचे म्हणजे पुन्हा एकदा सर्वाचाच विश्वास संपादन करावा लागणार होता. दोघेही आयुष्याची नवी लढाई लढण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सिद्ध झाले होते.

काही दिवसातां सुरू होणाऱ्या जागतिक महायुद्धात त्यांना अफगाणिस्तानच्या सैन्याशी झुंजायचे होते. यासाठी आपली शस्त्रे परजण्याची संधी त्यांना भारतातच उपलब्ध होणार होती. सकाळची कोवळी किरणे भूतलावर अवतरली आणि त्यांनी भारत देशाच्या दिशेने आपल्या प्रवासास सुरुवात केली. या वेळेस उद्याची सोनेरी स्वप्ने त्यांच्या डोळ्यांत तरळत होती.

(या पराक्रमी योद्धय़ांची नावे चाणाक्ष वाचकांनी ओळखली असतीलच!)