ऋषिकेश बामणे

सर्व बाद ३६. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात नोंदवलेल्या नीचांकी धावसंख्येमुळे चोहीकडून झालेली टीका. फलंदाजांच्या तंत्रात अभाव. खालावलेली वैयक्तिक कामगिरी. त्यातच प्रमुख फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली उर्वरित कसोटी मालिकेसाठी अनुपलब्ध. अशा सर्व आव्हानात्मक बाबींचा सामना करून मुंबईकर अजिंक्य रहाणे २६ डिसेंबर रोजी भारताचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे मेलबर्न येथील ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाची खरी कसोटी पाहायला मिळेल.

रहाणेच्या नेतृत्वक्षमतेविषयी तशी फारशी चर्चा रंगलेली कधीच पाहायला मिळालेली नाही. परंतु यंदा कोहली पितृत्वाच्या रजेमुळे कसोटी मालिका अर्धवट सोडूनच मायदेशी माघारी परतणार असल्याने रहाणेकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. रहाणेच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पहिल्या कसोटीत नेहमीच्या शैलीत फलंदाजी करणाऱ्या कोहलीला धावचीत करण्यात त्याचाच हातभार होता. कारण तेथूनच सामन्याचा नूर पालटला. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाबरोबरच तो फलंदाजीत संघाला कसे सावरतो, याकडेही तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. सुनील गावस्कर, इयान चॅपेल यांनी रहाणेच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले असून कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यातदेखील रहाणेने कर्णधार म्हणून छाप पाडल्याचे निदर्शनास आले.

शांत आणि संयमी स्वभावाचा रहाणे समाजमाध्यमांवरही अन्य खेळाडूंप्रमाणे फारसा व्यक्त होत नाही, परंतु खिलाडूवृत्तीमध्ये तो नेहमी अग्रेसर असतो. २०१५मध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्यावेळचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसेच कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे रहाणेला प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभली. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. तर दोन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी पत्करली. त्यानंतर २०१७ मध्ये धरमशाला येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे रहाणेकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. रहाणेने या लढतीत कुलदीप यादवला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि कुलदीपच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पहिला बळी मिळवल्यानंतर भावुक झालेल्या कुलदीपने रहाणेला दिलेले आलिंगन आजही अनेक चाहत्यांच्या स्मरणात आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध २०१८ मध्ये झालेल्या एकमेव कसोटीसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे नेतृत्वाची धुरा पुन्हा रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली. या कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर सहज वर्चस्व गाजवले. परंतु कसोटी प्रकारातील पहिलाच सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघातील सर्व खेळाडूंना रहाणेने मालिकाविजयाच्या चषकासह छायाचित्र काढण्यासाठी आमंत्रित करून चाहत्यांची मने जिंकली. नुकताच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यातसुद्धा डोक्यावर चेंडू आदळल्यामुळे जायबंदी झालेल्या विल पुकोवस्कीची विचारपूस करण्यासाठी दिवसाचा खेळ संपल्यानंतर रहाणे ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमजवळ गेल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर पसरली होती.

कसोटी संघातील महत्त्वपूर्ण फलंदाज असणारा ३२ वर्षीय रहाणे तब्बल तीन वर्षे एकही कसोटी शतक न झळकावू शकल्यामुळे एक वेळ निवृत्ती पत्करणार की काय, अशी शंकाही चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकून रहाणेने दमदार पुनरागमन केले. विदेशी खेळपट्टय़ांवरील त्याची कामगिरी नेहमीच उत्तम झालेली आहे. त्यामुळे रहाणेकडून नेतृत्वाबरोबरच फलंदाजीतही क्रिकेटप्रेमींना फार अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर रहाणे खरा उतरेल, अशी आशा बाळगू.

शमी उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार?

अ‍ॅडलेड : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी कमिन्सचा आखूड टप्प्याचा चेंडू मनगटाला लागल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याला तातडीने रुगणालयात नेण्यात आले. सायंकाळपर्यंत त्याच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होईल, असे कोहलीने सांगितले. शमीने माघार घेतल्यास मोहम्मद सिराजचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता बळावली आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यातही समाधानकारक गोलंदाजी केली होती.

रहाणेची कर्णधार कारकीर्द

प्रकार   सामने  विजय

कसोटी  २  २

एकदिवसीय  ३  ३

ट्वेन्टी-२०   २  १

एकूण   ७  ६

रहाणेकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी!

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत, परंतु यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी रहाणेकडे आहे. पहिल्या कसोटीतील निराशाजनक अपयशाला मागे सारून दुसऱ्या लढतीसाठी संघबांधणी करण्याकरिता रहाणेने पुढाकार घेतला पाहिजे. संघाचे मनोबल उंचावण्यासाठी त्याने वैयक्तिक कामगिरीतही प्रचंड सुधारणा करणे गरजेचे आहे. उर्वरित मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेनेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी आणि पृथ्वी शॉच्या जागी के. एल. राहुल किंवा शुभमन गिल यांना संधी द्यावी, असे मला वाटते.

– दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार