ही मागच्या आठवडय़ातली गोष्ट. पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत अँडी मरे आणि मिलास राओनिक यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार होती. सामन्याआधी तयारी सुरू असताना मरेला राओनिक भेटला. दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. साहजिकच मरेला विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यानं अंतिम फेरीत स्थान पटकावलं. कुठल्याही खेळाडूने माघार घेतल्यावर होणारी ही प्रक्रिया; पण मरेसाठी हा क्षण मोठ्ठं वर्तुळ पूर्ण करणारा होता. राओनिकच्या माघारीच्या निर्णयानं गणितीय समीकरणं बदलली आणि लहानपणापासून ज्या खेळाचा ध्यास जोपासला त्या खेळाच्या जागतिक क्रमवारीत मरेचं शिखरस्थान पक्कं झालं. एवढी मोठी घटना, पण तीही मरेसमोर अशा रूक्ष पद्धतीनं सादर झाली.

मरेचा अव्वल स्थानापर्यंतचा प्रवास म्हणजे खाचखळग्यांची ‘रोलर कोस्टर राइड’च आहे. कोणत्याही खेळातील सर्वोत्तम खेळाडू म्हटल्यावर गुणवैशिष्टय़ं डोळ्यासमोर तरळतात. रॉजर फेडरर म्हटल्यावर व्यक्तिमत्त्वातील शीतलता आणि ठेवणीतला एकहाती बॅकहँड, राफेल नदाल म्हणजे ताकदवान फोरहँड लगावणारा लढवय्या रांगडा भिडू; तर गमत्या स्वभावाचा, मात्र यंत्रवत सातत्याचे प्रतीक म्हणजे नोव्हाक जोकोव्हिच. असं वेगळं अनोखं मरेकडे काहीही नाही; पण हीच त्याची ताकद आहे. तो खोलवर नेटकी सव्‍‌र्हिस करतो. पल्लेदार परतीचे फटके लगावतो. तो चपळ आहे, पण काटक शरीरयष्टी वगैरे नाही. तो सुरेख खेळतो, पण कलात्मक सौंदर्य वगैरे नाही. खेळताना चुका झाल्या, की त्याची स्वगतं पाहणं रंजक असतं. पंचांचा निर्णय पटला नाही तर तो राग किंवा निराशा व्यक्त करतो; पण ही दुश्मनी वैैयक्तिक नाही, क्षणिक असते. खेळातला सर्वोत्तम म्हटल्यावर चाहते मखरात बसवतात. तसं पुण्य मरेला लाभलं नाही; पण तो अविरत प्रयत्न करत राहतो. अडथळे येतात, तो अडखळतो, उभा राहतो आणि पुन्हा प्रयत्न सुरू करतो. यशानं, जेतेपदानं इतक्या वेळा नाकारल्यानंतरही मरेची इच्छाशक्ती भरकटत नाही. परिस्थितीनं पोळलेला माणूस कडवट होतो. मरे थेट आणि स्पष्ट बोलतो; पण त्याच्या वाटचालीला कडवटपणाची झालर नाही. ‘कष्ट करेन आणि मोठा होईन’ या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी मरेचं शिखरावर जाणं नवी उमेद देणारं आहे. मरेच्या ‘ट्विटर हँडल’वर त्याची ओळख करून देणारं वाक्य आहे- ‘आय प्ले टेनिस’. क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचल्यावरही हे वाक्य कायम आहे.

नऊ वर्षांचा असताना शाळेतल्या एका घटनेचे व्रण मरेच्या मनावर कायमचे उमटले. मरे कुटुंबीयांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने अँडी आणि त्याचा भाऊ जेमी यांच्या शाळेत जाऊन बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 16 निरपराध शाळकरी मुलांसह एका शिक्षकाने जीव गमावला. मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील खुर्चीखाली लपून राहिल्याने अँडी आणि जेमी दोघे वाचले. परिचयाचा आणि नियमित वावरणारा माणूस इतका अमानवी कसा वागू शकतो याचं कोडं मरेला आजही उलगडलेले नाही. आजही हा विषय निघाला की, तो अस्वस्थ होतो. मरेच्या गुडघ्यांना आजार आहे. सामान्य माणसाचे गुडघे एकत्रित स्वरूपात कार्यरत असतात. मरेच्या गुडघ्यात दोन स्वतंत्र हाडं आहेत. या आजाराचं निदान 16व्या वर्षी झालं. उपचार झाले, पण त्रास आजही कायम आहे. टेनिससारख्या हालचालीची परीक्षा पाहणाऱ्या खेळात अशा गुडघ्यांसह खेळणं जिकिरीचं, पण मरेनं ते शक्य करून दाखवलंय.

मरेची आई टेनिस प्रशिक्षक, तर आजोबा फुटबॉलपटू. काका गोल्फपटू. गोतावळा खेळांमधला असला तरी लहान असतानाच मरेच्या आईबाबांचा घटस्फोट झाला. त्यामुळे कुटुंबाचे छत्र आणि पाठिंबा नाही. टीम हेनमननंतर इंग्लंडची आशा झालेला मरे मूळचा स्कॉटलंडचा. मात्र प्रगत प्रशिक्षणासाठी त्याने स्पेन गाठलं. बार्सिलोनातल्या सँचेझ कॅसल अकादमीत मरेनं सगळी कौशल्यं घोटली. लहान वयात घरापासून दूर राहणं कठीण असतं, पण मरेने हेही साधलं. प्रतिभेला पैलू पाडल्यानंतर मरेचा प्रवास सुरू झाला. देशांतर्गत स्पर्धामध्ये प्रभुत्व गाजवल्यानंतर २००३च्या सुमारास मरे आंतरराष्ट्रीय पटलावर आला. ५४०व्या स्थानापासून अव्वल स्थानापर्यंत जाण्यासाठी मरेला १३ वर्षे लागली. रॉजर फेडरर व राफेल नदालची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरची सद्दी आणि त्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचचं वर्चस्व या धामधुमीत मरे झाकोळून गेला. मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्यांना ‘चोकर्स’ म्हणतात. क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघाला चिकटलेला शिक्का मरेच्या नावालाही लागला. २००५मध्ये मरेने ग्रँड स्लॅम पदार्पण केलं. उपांत्य फेरी हा त्याचा माघारी परतण्याचा टप्पा. जेतेपदाच्या इतकं समीप येऊनही वंचित राहावं लागे. २०१२मध्ये अखेर मरेचं ग्रँड स्लॅम जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. पुढच्याच वर्षी विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरत एका स्पर्धेचा चमत्कार नसल्याचं मरेनं सिद्ध केलं.

टीका, पराभव, आकडेवारी यांनी विचलित न होता मरे खेळत राहिला. मुख्य म्हणजे प्रत्येक हंगामात तो स्वत:ला सुधारत होता. महान खेळाडू इव्हान लेंडल यांनी मरेला आणखी कणखर केलं. लेंडल यांच्यानंतर महिला टेनिसपटू अ‍ॅमेली मॉरेस्मो यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करत मरेनं नवीन पायंडा रचला. वर्षांनुवर्षे दुसऱ्या फळीत राहूनही मरेनं स्वत:ला कमी लेखलं नाही. खेळात चुका केल्या, त्या मान्य केल्या. चुका कमी होत गेल्या आणि मरे घडत गेला. या प्रवासात पत्नी कीम सिअर्सची त्याला भक्कम साथ मिळाली. ग्रँड स्लॅमसाठी प्रदीर्घ प्रतीक्षेदरम्यान मरेनं दोन ऑलिम्पिक सुवर्णपदकांवर नाव कोरलं. याच कालावधीत इंग्लंड डेव्हिस चषक संघाचा तो कणा झाला. १९७४मध्ये क्रमवारीची संरचना आल्यापासून फक्त २६ खेळाडू अव्वल स्थानी पोहोचले आहेत. यावरून अव्वल स्थानी विराजमान होणं किती खडतर असेल याची कल्पना यावी. क्रमवारीतील स्थान बदलत राहतं. ते प्रतीकात्मक असतं. आजूबाजूच्या कल्लोळातही तुम्ही ठाम असाल आणि ध्येयाविषयी निष्ठा पक्की असेल तर तुम्हीही तुमच्या क्षेत्रातले सर्वोत्तम होऊ शकता, ही मरेने दिलेली शिकवण चाहत्यांसाठी महत्त्वाची!

parag.phatak@expressindia.com