सुप्रिया दाबके

टेनिसपटूंची मैदानावरील रागनाटय़े क्रीडा क्षेत्रासाठी नवी मुळीच नाहीत. रॅकेट फेकणे, पंचांशी हुज्जत घालणे यांसारख्या अनेक उदाहरणांचा इतिहास साक्षीदार आहे. आता या वादग्रस्त टेनिसपटूंमध्ये सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची भर पडली आहे.

जोकोव्हिच हा तसा ‘जोकर’ म्हणून ओळखला जातो. टेनिस कोर्टवर तर अनेकदा एकमेकांच्या नकला करून त्याने प्रेक्षकांना हसवले आहे. त्यामुळेच हे टोपणनाव त्याला पडले आहे. पण अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील त्याचे वागणे धक्कादायक असेच होते. चौथ्या फेरीतील गेम गमावल्यानंतर जोकोव्हिचने चेंडू रागाच्या भरात अनवधानाने फटकावला. मात्र तो थेट रेषेवरील महिला पंचांच्या घशावर आदळला. अर्थातच व्हिडीओमध्ये किंवा प्रत्यक्ष लढत पाहणाऱ्यांना जोकोव्हिचने हे जाणूनबुजून केले नसल्याचे सहज जाणवेल. मात्र जोकोव्हिचने दिलगिरी व्यक्त केलीही, पण संयोजकांनी नियमाचा आधार घेत त्याला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. जोकोव्हिचने चेंडू भिरकावल्यानंतर पंचांना तो लागला, तेव्हा जोकोव्हिच प्रथम धावत गेला. त्याने तातडीने त्या पंचांकडे माफी मागितली. घडल्या प्रकाराबद्दल पूर्णपणे तो दोषी असल्याचे मान्य केले आणि हेतुपुरस्सरपणे हे कृत्य केले नसल्याचेही स्पष्ट केले. जोकोव्हिचला संयोजकांनी नियमाचा बडगा दाखवल्यामुळे या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जोकोव्हिचवर सर्वात कठोर कारवाई झाली, असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

टेनिसजगताने याआधी टेनिसपटूंच्या रागाची अनेकदा प्रचीती घेतली आहे. निक किर्गियोस, आंद्रे आगासी, जॉन मॅकेन्रो या माजी टेनिसपटूंनी टेनिस कोर्ट वादविवादांनी गाजवले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या किर्गियोसने इटली येथील टेनिस स्पर्धेत रागाच्या भरात खुर्ची फेकली होती. त्या घटनेनंतर त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. याच किर्गियोसने जोकोव्हिचच्या घटनेनंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेते. ‘‘जर चुकून मी बॉलबॉयच्या घशावर चेंडू मारला तर मला किती वर्षांची शिक्षा होईल?’’ असा सवाल किर्गियोसने केला आहे. २०१७मध्ये कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हने डेव्हिस चषकातील लढतीत चेंडू पंचांच्या चेहऱ्याच्या दिशेने रागाच्या भरात भिरकावला होता. त्यानंतर डेव्हिस चषकातील लढतीतून शापोवालोव्ह अपात्र ठरला होता. १९९०मध्ये अमेरिकेच्या मॅकेन्रोला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मैदानावरील वादग्रस्त वागण्याबद्दल तीन वेळा समज देण्यात आली होती. मात्र सुधारणा न केल्याने त्याला स्पर्धेबाहेर काढण्यात आले. आंद्रे आगासी हा जोकोव्हिचचा काही वर्षांपूर्वी प्रशिक्षक होता. मात्र आगासीलाही प्रेक्षकांमध्ये रागाने चेंडू भिरकावणे आणि पंचांना शिवीगाळ करणे यामुळे स्पर्धेला मुकावे लागले आहे.

जोकोव्हिच हा गेले काही महिने वादग्रस्त कारणांनीच चर्चेत राहिला आहे. करोना साथीच्या काळात जोकोव्हिचने सर्बिया येथे प्रदर्शनीय टेनिस सामन्यांचे आयोजन जूनमध्ये केले होते. त्या सामन्यांनंतर जोकोव्हिचसह आघाडीच्या टेनिसपटूंना करोनाची लागण झाली. त्या प्रदर्शनीय लढतींमध्ये सुरक्षित अंतराचे पालन झाले नाही आणि सर्व खेळाडूंनी एकमेकांना आलिंगन दिले आणि स्पर्धेनंतर मेजवानीही केल्याचे प्रकाशात आले. प्रदर्शनीय सामने करोना संसर्गाला प्रेरक ठरल्यामुळे जोकोव्हिचला जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांवरूनही जोकोव्हिचने टीका केली होती. मात्र तरीही तो स्पर्धेत सहभागी झाला होता. वास्तविक स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल या खेळाडूंनी अमेरिकन स्पर्धेतून माघार घेतल्याने जोकोव्हिचला जेतेपदासाठी निर्विवाद दावेदार मानले जात होते. जोकोव्हिच यंदा १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक होता. याशिवाय अग्रस्थानही त्याच्याकडेच होते. यंदाच्या वर्षांत जोकोव्हिचने २६ सामन्यांत विजय मिळवताना चार विजेतेपदेही जिंकली होती. मात्र या धक्कादायक घटनेने जोकोव्हिचने संधी तर गमावलीच, शिवाय त्याचे नाव वादग्रस्त खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाले.

जोकोव्हिचला स्पर्धेबाहेर काढण्याची जी कारवाई झाली, ती योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहे. मात्र जोकोव्हिच, नदाल आणि फेडरर हे तीन खेळाडू नसल्याने यंदा नवा विजेता अमेरिकन खुल्या स्पर्धेला मिळणार आहे. २००४ नंतर कोणत्याही गँड्रस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच फेडरर, नदाल आणि जोकोव्हिच हे तीन खेळाडू नव्हते. या तिघांनी मिळून मागील १३ ग्रँडस्लॅम विजेतेपदे त्यांच्या नावे केली आहेत. त्याला अपवाद स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वाविरकाने २०१६मध्ये जिंकलेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेचा आहे. एक मात्र नक्की की, टेनिसचा इतिहास हा फेडरर, नदाल, जोकोव्हिचशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सर्वाचे आदर्श असणाऱ्या या तिघांकडून खेळाच्या उंचीप्रमाणेच सभ्य गृहस्थाप्रमाणे वागण्याची टेनिसजगताची अपेक्षा आहे.

supriya.dabke@expressindia.com