सुप्रिया दाबके

रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल यांच्याशिवाय टेनिसचा इतिहासच लिहिला जाणार नाही. कारण या तिघांनी मागील ६७ ग्रँडस्लॅमपैकी ५६ ग्रॅँडस्लॅम जेतेपदे मिळवली आहेत. २० जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा फेडरर-जोकोव्हिच-नदाल यांचेच वर्चस्व दिसेल. कारण अद्याप तिघांच्या वर्चस्वाला आव्हान देणारा टेनिसपटू निर्माण झालेला नाही. महिलांमध्ये जेतेपदाचा दावेदार ठरवणे सध्याच्या घडीला कठीण आहे. भारताकडून एकेरीत प्रज्ञेश गुणेश्वरकडून आणि दुहेरीत सानिया मिर्झा, रोहन बोपण्णाकडून आशा आहेत.

पुरुषांमध्ये त्रिमूर्तीची छाप

टेनिसजगतात आतापर्यंत ब्योन बोर्ग- जॉन मॅकेन्रो, आंद्रे आगासी-पीट सॅम्प्रस अशा अनेक मातब्बरांमधील लढती गाजल्या आहेत. मात्र टेनिसविश्वावर फेडरर, जोकोव्हिच आणि नदाल हेच सर्वाधिक राज्य करीत आहेत. फेडरर, नदाल, जोकोव्हिच हे २०१०च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेवेळीही अव्वल तीनमध्ये होते. आता पुन्हा १० वर्षांनंतरही या स्पर्धेच्या वेळी चित्र बदललेले नाही. फक्त फरक इतकाच की २०१०च्या वेळेस फेडरर पहिल्या, नदाल दुसऱ्या आणि जोकोव्हिच तिसऱ्या स्थानावर होता. यंदा नदाल पहिल्या, जोकोव्हिच दुसऱ्या आणि फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

फेडररच्या खात्यावर विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम जेतेपदे आहेत. नदाल जिंकल्यास त्याला फेडररच्या २० ग्रॅँडस्लॅमशी बरोबरी साधता येईल. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यात उपांत्य लढत होऊ शकते. त्यामुळे नदालला अंतिम लढतीपर्यंत फेडरर आणि जोकोव्हिचचा धोका नाही. मात्र नदालला एकदाच (२००९) या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले आहे. त्यावेळेस पाच सेटमध्ये झालेल्या लढतीत नदालने फेडररचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर फेडरर ढसाढसा रडल्याचे टेनिसजगताने पाहिले होते. जोकोव्हिच १६ ग्रॅँडस्लॅम विजेता असून ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचा गतविजेता आहे. तब्बल सात वेळा या ग्रॅँडस्लॅमचे जेतेपद जोकोव्हिचने मिळवले आहे. तिशी ओलांडूनही तंदुरुस्ती राखलेले अशी फेडरर (३८ वर्षे), नदाल (३३ वर्षे) आणि जोकोव्हिच (३२ वर्षे) यांची ओळख आहे. रशियाचा डॅनिल मेदवेदेव, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यासारखे नवीन दमाचे खेळाडू ग्रॅँडस्लॅम जिंकू शकतील का, याविषयी फक्त चर्चा होते. मात्र सध्या तरी अव्वल तिघांशिवाय पर्याय नाही.

ऑस्ट्रेलियन जेतेपदे

* फेडरर (६) : २००४, २००६, २००७, २०१०, २०१७, २०१८

* नदाल (१) : २००९

* जोकोव्हिच (७) : २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९

महिलांमधून अ‍ॅश्ले बार्टी, सेरेनाकडून अपेक्षा

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या गटात नवनव्या विजेत्या पाहायला मिळत आहेत. मात्र गेल्या वर्षी फ्रेंच खुली ग्रॅँडस्लॅम जिंकणारी ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ली बार्टीकडून यजमान प्रेक्षकांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. कारण जागतिक महिलांच्या क्रमवारीतही बार्टी अव्वल स्थानी आहे. अर्थातच फ्रेंच स्पर्धा जिंकल्यानंतर तिला विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीतच गारद व्हावे लागले होते. याशिवाय विक्रमी २३ ग्रॅँडस्लॅम विजेती अमेरिकेची सेरेना विल्यम्स आई झाल्यानंतर तीन वर्षांनंतर प्रथमच ऑकलंड येथील टेनिस स्पर्धेत विजेती ठरली. वयाच्या ३८व्या वर्षीही जिंकलेल्या सेरेनाचा उत्साह थोडाही कमी झालेला नाही. विशेष म्हणजे सेरेनाने शेवटची ग्रॅँडस्लॅम खुली टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियातच २०१७मध्ये जिंकली होती. सेरेनाच्या लढतींना टेनिसप्रेमींची सर्वाधिक उपस्थिती असेल यात शंका नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅँडस्लॅम जिंकणारी नाओमी ओसाकाकडूनही अपेक्षा आहेत. नाओमीची गोष्टदेखील फारच आगळीवेगळी आहे. १९९९च्या फ्रेंच खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सेरेना आणि व्हिनस या विल्यम्स भगिनी खेळत होत्या. तेव्हा नाओमीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला टेनिसचे धडे देण्याचा निर्णय घेतला होता. हे नमूद करण्याचे कारण म्हणजे स्पर्धेचे वेळापत्रक पाहता नाओमी आणि सेरेना यांची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडू शकेल.

भारताला सानिया, बोपण्णाकडून अपेक्षा

भारताकडून गेल्या वर्षी प्रज्ञेश गुणेश्वरनने चारही ग्रॅंडस्लॅमच्या मुख्य एकेरीत प्रवेश केला होता. यंदा मात्र प्रज्ञेशला नशिबाने मुख्य फेरी गाठता आली आहे. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा रोहन बोपण्णाच्या साथीने खेळणार आहे. याशिवाय पुरुष दुहेरीत बोपण्णा जपानच्या यासुटाका उचियामाच्या साथीने खेळेल, तर महिला दुहेरीत सानिया युक्रेनच्या नाडिया किचेनॉकच्या साथीने खेळेल.

supriya.dabke@expressindia.com