डॉ. प्रकाश परांजपे panja@demicoma.com

ब्रिज शिकण्याच्या वाटेवरचा पहिला टप्पा म्हणून आता तुम्हीसुद्धा ब्रिज-मुम्ब्री हा खेळ खेळू शकाल. चार खेळाडू जमवा (त्यांना आपण उत्तर-पूर्व-दक्षिण-पश्चिम असं म्हणू), पत्त्यांचा  एक कॅट घ्या, त्यातले जोकर बाजूला ठेवा व चार पंथांचे ५२ पत्ते घेऊन खेळ चालू करा. उत्तर पहिला डाव वाटेल. ब्रिज-मुम्ब्रीमध्ये पानं एकगठ्ठा ७-६ अशी वाटतात. प्रथम ७ डाव्या खेळाडूला, ७ समोर भिडूला, मग ७ उजव्याला, मग ७ स्वत:ला, आणि मग त्याच क्रमाने ६-६-६-६.

सगळी पानं वाटून झाल्यावर प्रत्येक खेळाडू आपापली पानं हातात घेईल. आपली पानं  इतर खेळाडूंना दिसणार नाहीत याची काळजी घेणं जरुरी आहे. तेरा पानं हातात धरताना पहिल्यांदा तारांबळ उडते, पण प्रत्येक पानाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात एक छोटंसं चित्र त्या पानाची पूर्ण ओळख पटण्याकरता पुरेसं आहे. या छोटय़ा चित्राचा उपयोग करून तेरा पानांचा हातात धरण्यासाठी सुटसुटीत असा पंखा करता येतो.

यानंतरचा भाग म्हणजे दस्त बनविण्याचा ठेका मिळविण्याकरिता बोली लावणे. ज्या खेळाडूने डाव वाटला त्याची पाळी पहिली. बोली कमीतकमी ७ ची पाहिजे.  हातात एखाद्या पंथाची पानं – समजा किलवर – भरपूर असतील, आणि डाव चांगला असेल तर तो सात किंवा आठ किलवरने सुरुवात करू शकतो, डाव चांगला नसेल तर ‘पास’ किंवा ‘पुढे’ म्हणू शकतो. पुढची बोली लावण्याची पाळी पूर्वेची. साताच्या  बोलीवर आठ किंवा अधिक दस्त करण्याची बोली पाहिजे, नाहीतर पास, म्हणजेच लिलावाप्रमाणे प्रत्येक पुढची बोली पूर्वीच्या बोलीपेक्षा वरची पाहिजे. फक्त ब्रिज-मुम्ब्रीची बोली आणि लिलावाची बोली यात फरक इतकाच की खेळात ज्याची बोलायची पाळी आहे, तोच बोली करू शकतो. या प्रकारे लिलाव पुढे सरकतो आणि तीन खेळाडूंनी रांगेत पास म्हटल्यावर संपतो. ज्याची बोली सर्वात वरची त्या खेळाडूला डावाचा ठेका मिळतो.

यानंतर दस्त बनविण्याकरता खेळ चालू होतो. पहिलं पान खेळण्याचा मान प्रतिपक्षाचा. दस्त खेळण्याचे नियम काय असतात याची चर्चा आपण यापूर्वीच्या लेखांत केली आहेच.

सगळी पानं खेळून झाल्यानंतर कुठल्या जोडीने किती दस्त जिंकले हे स्पष्ट होतं. जर ठेका जिंकणाऱ्या पक्षाने जेवढी बोली तेवढे किंवा जास्त दस्त जिंकले तर त्या पक्षाला गुण मिळतात, नाहीतर त्याच्या प्रतिस्पध्र्याना. याकरता आपण एक तात्पुरती पद्धत वापरूया. बोली इतके किंवा अधिक दस्त बनवले तर ठेकेदार जोडीला तितके गुण, नाहीतर बोलीपेक्षा कमी दस्त बनविले तर प्रतिस्पर्धी जोडीला कमी पडलेले दस्त + ६ इतके गुण, उदाहरणार्थ ‘उद’ जोडीने ८ चौकटच्या ठेक्यात ९ हात बनविले तर त्यांना ९ गुण  मिळतील, जर ७च , म्हणजे बोलीपेक्षा एक कमी, बनविले तर ‘पपू’ जोडीला ६+१ = ७ गुण.याप्रमाणे काही डाव खेळून तुमचा अनुभव / निकाल #ब्रिजमुम्ब्री या हॅशटॅगने ट्वीट करा, किंवा ईमेलने कळवा म्हणजे या पहिल्या टप्प्यात आपण किती वाटचाल केली त्याचा अंदाज येईल.

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)