डॉ. प्रकाश परांजपे

ख्रिसच्या ४ इस्पिकच्या ठेक्याविरुद्ध पिंकीनं बदाम गुलामाची उतारी केली, छोटूनं रांगेने बदाम राणी-राजा-एक्का असे वाजवून घेतले आणि चौथ्या दस्ताला तो किलवर राजा खेळला. ख्रिसनं थोडा वेळ डावाचा विचार केला आणि १० दस्त बनविण्याची एक नामी योजना त्याला सुचली. छोटू-पिंकीला ती नीटपणे कळावी म्हणून खेळता-खेळता त्याने बोलणं चालू ठेवलं. आपले विचार बोलून दाखवत खेळणं नियमात बसतं का, अशी शंका पिंकीच्या डोक्यात चमकून गेली, पण अध्यक्ष महोदयांकरिता अमेरिकेत वेगळे नियम असावेत असं समजून तिनं तो प्रश्न मोठय़ाने विचारला नाही.

पहिल्यांदा त्यानं आपल्या हातातले नगद दस्त मोजले. पाच इस्पिक हुकमाचे, तीन चौकट एक्का-राजा-राणीचे आणि किलवर एक्का असे मिळून नऊ दस्त सरळ दिसत होते. दहावा कुठून पैदा करायचा, हा मात्र प्रश्न होता. अर्थातच हुकमाचे पाच दस्त मिळण्याकरिता इस्पिक राणी कुणाकडे आहे, याचा अदमास लावणं आवश्यक होतं. आत्तापर्यंत झालेल्या खेळावरून हे दिसत होतं की छोटूकडे बदामचे एक्का-राजा-राणी म्हणजे ९ चित्रगुण होते. शिवाय चौथ्या दस्ताच्या किलवर राजाच्या चालीवरून हेही स्पष्ट होतं की, राजा-राणी दोन्ही त्याच्याकडेच असावीत. त्यांचे पाच चित्रगुण धरून छोटूच्या १४ चित्रगुणांची मोजदाद होत होती. बोलीसत्राच्या वेळेला त्यानं १ किलवर बोलीनं खातं उघडलं होतं, म्हणजे १२-१४ चित्रगुण दाखवले होते. इस्पिक राणीही त्याच्याकडे असती तर १६ चित्रगुण झाले असते, त्याने १ चौकट बोलीने डावाची सुरुवात केली असती. याचाच अर्थ असा की, इस्पिक राणी पिंकीकडे असणार हे जवळपास पक्कं  होतं.

ख्रि्रसनं किलवर एक्क्याने चौथा दस्त जिंकून बघ्याच्या हातातून किलवर खेळून इस्पिक दश्शीने मारती घेतली. पुढच्या दस्ताला चौकट एक्क्यानं तो  बघ्याच्या हातात पोचला आणि आणखीन एक किलवर खेळून या वेळी त्यानं हातातल्या इस्पिक गुलामाने मारती घेतली. यानंतर मग तो हातातून एक छोटं इस्पिक खेळला. पिंकीनं छोटं पान टाकल्यावर त्यावर बघ्याच्या हातातून इस्पिक अठ्ठी टाकून त्यानं इस्पिक राणीला बगलेत घेतलं आणि बघ्याच्या हातातून तो शेवटचं किलवरचं पान खेळला. या वेळी त्यानं चक्क इस्पिक एक्कय़ानं मारती घेतली. पिंकीकडे आता किलवरचं पान उरलं नव्हतं, पण हुकमाच्या एक्कय़ापुढे हार मानणं भाग होतं. तिने एक बदामचं पान जाळलं.

आता बघ्याच्या हातात इस्पिक राजा-नश्शी आणि चौकट राजा-राणी अशी चार पानं उरली होती. ख्रि्रस हातातलं उरलेलं छोटं हुकमाचं पान आता खेळला, पिंकीच्या राणीवर बघ्याच्या हातातून राजा खेळला आणि आणखीन नश्शी खेळून पुढच्या दस्ताला त्यानं छोटूचा उरलेला हुकूम काढला. चौकट राजा-राणीचे शेवटचे दोन दस्त झाले. तीन किलवरच्या मारतीचे, ३ हुकमाचे, ३ चौकटचे व किलवर एक्का असे दहा दस्त होऊन ख्रिसचा ४ इस्पिकचा ठेका वटला.

‘‘या खेळीला इंग्रजीमध्ये ‘डमी रिव्हर्सल’ असं म्हणतात,’’ ख्रिसने खुलासा केला. आबा अशा डावात ‘बघ्याला डोक्यावर बसवून’ किंवा ‘बघ्याला शिरजोर’ करून ठेका बनवला, असं म्हणतात, असं भास्करने सांगितलं.  मुलांच्या ब्रिजच्या ज्ञानात आता जोराने भर पडत होती.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)